सूरज नाईकपवार, लोकमत न्युज नेटवर्क, मडगाव: आज सोमवारी गोव्यात धावत्या रेल्वेच्या ब्रॅक बाईन्डिंगने पेट घेतल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. रेल्वेने थिवी स्थानकात थांबा घेतला असता गस्तीवर तैनात कोकण रेल्वे पोलिसांच्या ध्यानी हा प्रकार लक्षात आला. त्वरीत पोलिसांनी आधीच त्या बोगीतील व शेजारच्या दाेन बाेगीतील प्रवाशांना खाली उतरविले व नंतर आग विझविण्याच्या उपकरणाने आग विझविली व पुढील अनर्थ टळला.
एर्नाकुलमहून अजमेरला प्रवासाला निघालेल्या रेल्वे गाडी क्रमांक १२९७७ रेल्वेत बोगी क्रमांक एस २ मध्ये वरील घटना साेमवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. यावेळी ती धावती रेल्वे थिवी रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर दूर होती. रेल्वे थिवी येथे पोहचल्यानंतर सर्वांच्याच लक्षात ही गोष्टी आली. धूर येत होता. प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली होती. आणिबाणीची परिस्थिती बघून आधी त्या बोगीतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.कोकण रेल्वेचे पोलिस विशाल केरकर व वासिम शेख तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी नंतरअथक परिश्रमांनंतर स्थिती सुरळीत केली. सुमारे दीड तासांच्या यशस्वी प्रयत्नानंतर रेल्वे पुढील प्रवासाला निघाली व प्रवशांनीही सुटकेचा निश्वास सोडला.