लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव: गोव्यातून हैदराबादला जात असलेल्या तेलंगणा येथील खासगी पर्यटक बस मद्यपी चालकाचा ताबा सुटल्याने दुर्गिणी - धारबांदोडा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला उलटली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर बसखाली सापडलेल्या महिलेला वाचविण्यात यश आले आहे. अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून, घटनास्थळी रात्रीपर्यंत मदतकार्य सुरू आहे.
४० पर्यटक प्रवाशांना घेऊन टीएस १२ युडी ९७०७ क्रमांकाची खासगी काल गोव्यातून हैदराबादकडे निघाली होती. दुर्गिणी- धारबांदोडा येथे हॉटेल आमिगोसजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला ती उलटली. या गंभीर अपघातात सुमारे २५ प्रवासी जखमी झालेले आहेत. महिला व बस चालक बसखाली चिरडले होते. त्यातील चालकाचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिस आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले.
बस अपघातात जखमी झालेल्यांवर तिस्क उसगाव येथील पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. नंतर गंभीर जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना बांबोळी तेथे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पिळये प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. संदेश मडकईकर यांनी जादा डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन सर्व जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचार केले.
तीन चालक, पण.....
बसमध्ये तीन चालक होते. त्यातील मद्यपान केलेला चालक बस चालवत होता. दुर्गिणी- धारबांदोडा येथे हॉटेल आमिगोस जवळ चालकाचा बसवर ताबा सुटला आणि बस खोल दरीत उलटली, अशी माहिती बसमधील एका जखमी प्रवाशाने दिली. मद्यपानाच्या नशेत त्याला बसच्या वेगाच्या गतीवर नियंत्रण ठेवता आले नाही. परिणामी बसच्या स्टेरिंगवरील नियंत्रण जाऊन बस रस्त्याकडेच्या बाजूला उलटली. बस चालक त्याच बसखाली चिरडून ठार झाला.