लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचे दोन प्रकार रविवारी उघडकीस आले. एका प्रकरणात शिक्षकाच्या नोकरीचे आमिष दाखवून १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सागर सुरेश नाईक (कुर्टी- फोंडा) याला पोलिसांनी अटक केली, तर ४० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संशयित निवृत्त पशुवैद्यकीय डॉक्टर प्रकाश मुकुंद राणे (सिंधुनगर-कुटर्टी) याला पोलिसांना अटक केली. त्याला पणजी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पूजा नाईक हिच्या उघडकीस आलेल्या फसवणूक प्रकरणानंतर सरकारी नोकऱ्यांसाठी दलालांचा सुळसुळाट वाढल्याचे उघड झाले.
पोलिसांनी सांगितले की, कुर्टी येथील सिंधुनगर कॉलनीत राहणाऱ्या संशयित प्रकाश राणे याच्याविरोधात उषा ऊर्फ शीतल श्रीधर आश्वेकर, संतोष सूर्या गोवेकर, पूजा सीताराम खोर्जुवेकर, सुषमा गावस यांनी फोंडा पोलिस ठाण्यामध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार संशयित प्रकाश राणे याने २०१९ ते २०२२ या कालावधीत आश्वेकर, गोवेकर, खोर्जुवेकर आणि गावस यांच्याशी संपर्क साधून त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखविले. नोकरी मिळवून देण्यासाठी 'डील' करण्यात आली. नोकरी मिळणार या आशेने सर्वांनी सुरुवातीला आपापले पैसे संशयित प्रकाश राणेकडे जमा केले. संशयिताने त्यांच्याकडून सुमारे ४० लाख रुपये घेतले. काही दिवसांनंतर चौघांनी त्याच्याकडे नोकरीसाठी तगादा लावला असता, तो त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. नोकरी मिळणार नसल्याचा संशय येताच चौघांनी आपले पैसे परत देण्याची मागणी केली.
मात्र, टाळाटाळ होऊ लागल्याने त्याच्याविरोधात फोंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारी आल्यानंतर पोलिस चौकशीत संशयित राणे याचा थेट सहभाग असल्याचे आढळले. त्यानंतर संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून पणजी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
जामीन अर्जाला विरोध
पोलिस कॉन्स्टेबल सागर नाईक याच्याविरुद्ध यापूर्वीही एका प्रकरणात फोंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून पोलिसांनी जामिनाला विरोध केला आहे. संशयित हा पोलिस असल्याने तो तक्रारदारावर दबाव आणू शकतो. त्याचबरोबर पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करू शकतो, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. त्याचा या प्रकरणात नक्की कसा सहभाग आहे ? यामध्ये आणखी कोण सामील आहेत, याचा तपास करायचा असल्याने पोलिसांनी सागरला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी केली आहे.
तक्रारींसाठी संपर्काचे आवाहन
फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. सध्या फोंडा तालुक्यात नोकरी देण्याच्या बदल्यात पैसे घेण्याचे जे प्रकार उघडकीस आले आहेत, त्यानंतर पोलिस सतर्क झाले आहेत. नोकरीसाठी अशाप्रकारे कोणी पैसे दिले असतील, फसवणूक झाली असेल तर त्यांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी केले आहे.
१७ जुलैपासून मारली दांडी
दरम्यान, सागर नाईक हा भारतीय राखीव दलात कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे, सध्या तो डिचोली आयआरबी कॅम्पमध्ये कार्यरत आहे. मात्र, १७ जुलैपासून तो कामावर गेलाच नाही. तक्रार दाखल केलेल्या दिवसापासून पोलिस सागर याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्याला कामावर हजर होण्यासंबंधी सांगण्यात आले. मात्र, तो आला नव्हता. काल, रविवारी त्याला अटक करण्यात आली. त्याला नोकरीवरून 'फरार' घोषित करण्याची प्रक्रिया पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजीच सुरू केली होते.