- किशोर कुबल पणजी - पेडणे तालुक्यात लोकसभा उमेदवारच्या प्रचारावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव मांद्रेचे मगोप आमदार जीत आरोलकर यांना उद्देशून वापरलेल्या शब्दाचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी निषेध केला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, युरी यांची ही भाषा अत्यंत निंदनीय आहे. काँग्रेसला लोकशाही मूल्यांचा कोणताही आदर राहिलेला नाही. घटना धोक्यात असल्याचा निव्वळ बाऊ काँग्रेसकडून केला जातो. प्रत्यक्षात मात्र हे लोक भेकड कथा सांगत अजून लोकांची दिशाभूल करीत आहेत. इंडिया आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसने एकेकाळी लोकशाही मूल्ये पातळी तुडवून लोकांवर आणीबाणी लादली होती, हे लक्षात घ्यायला हवे.
दरम्यान, भंडारी समाजाच्या युवा आघाडीने पत्रकार परिषद घेऊन युरी यांचा निषेध केला आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांच्या प्रचारावेळी युरी यांनी तालुक्यातील एका सभेत जीत यांना उद्देशून 'लापीट' असा शब्द वापरला होता. या आक्षेपार्ह शब्दाबद्दल निषेध केला जात आहे.