पणजी: आमचा देश इतर देशाच्या तुलनेत खुप प्रगतीशील देश आहे. युरोपमध्ये लोक दगड उचलायला लागले होते, तेव्हा आमच्या देशात विविध सभ्यता कार्यरत होती. आपण नेहमीच महिला अन्यायावर बोलत आहोत, पण देश घडविण्यास महिलांचे योगदान अविस्मरणीय आहे. मुळात आपण बारकाईने पाहिले तर आमची सभ्यताच स्त्रीवादी सभ्यता राहीली आहे. अर्धनारीश्वर रुप, द्रोपदीची गोष्ट, सत्यवान सावित्रीची गोष्ट आम्हाला याची आठवण करुन देते, असे प्रतिपादन जेएनयु दिल्लीची कूलगुरु शांतिश्री पंडीत यांनी केले.
पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी महाविद्यालयतर्फे उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा राज्य महिला आयोग यांच्या सहाय्याने पाटो येथील संस्कृती भवन येथे जेंडर राईट्स या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परीषदेच्या उद्घाटन सत्राला प्रमुख पाहुणे व वक्ता म्हणून शांतिश्री पंडीत बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत गोवा विद्यापीठाचे कुलगूरु प्रा. डॉ. हरीलाल मेनन, राज्य महिला आयोगाच्या प्रमुख रंजीता पै, विद्याप्रबोधीनी महाविद्यालयाचे व्यवस्थापक संजय वालावालकर, प्राचार्य भूषण भावे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मी डाव्या किंवा उजव्या विचारांना मानत नाही, कारण आमचे तत्वज्ञान या गोष्टींना मानत नाही. या सर्व गोष्टी पश्चिमी देशातील आहेत. महिला आपल्या बळावर मोठ्या होत असतात, या गोष्टीवर मी ठाम आहे आणि सध्याचे सरकारही महिला सशक्तीकरणावर भर देत आहे, हे पाहूण आनंद होतो. महिला सशक्तीकरणाचे जीवंत उदाहरण म्हणजे मीच आहे. मी तामिळनाडू सारख्या राज्यातून येते आणि माझी जातही इतरांच्या तुलनेत कमी आहे, पण मी जेएनयुची पहिली महिला कूलगुरू आहेे. देशाने महिलांना खुप काही दिले आहेे. आमची सभ्यता आम्हाला जीवनाचा सार्थ शिकवते. आम्ही सर्वात आधी मातृ देवो भव: असे म्हणतो, व नंतर पितृ देवो भव: आणि आचार्य देवो भव: यातच सर्वकाही आले, असे पंडित यांनी यावेळी सांगितले.
महिलांना जर आपला विकास करायचा असेल तर आपल्यावरील सर्व बंधनांमधून मुक्त झाले पाहीजे. मला सांगण्यात अभिमान वाटतो की गोवा विद्यापिठात ६२ टक्के महिला विद्यार्थी आणि तेवढेच टक्के महिला कर्मचारी आहे. गोवा देखील इतर राज्यांच्या तुलनेत खुप वेगळा आहे. समान नागरी कायदा असणारा गोवा हे पहिले राज्य आहे. त्यामुळे गोवाकडून महिला सशक्तीकरणबाबत देखील शिकण्यासारखे खुप काही आहे, असे प्रो. डॉ. हरीलाल मेनन यांनी सांगितले.