पणजी : २०१९ च्या जुन्या आराखड्यातील आखणीनुसारच शॅक उभारले जाणार असून आजपासून प्रत्यक्ष शॅक उभारण्याचे काम सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाअंती या प्रश्नावर तोडगा निघाला.
शॅक उभारणीसाठी २०१९ चा जुना आराखडाच लागू करण्याची व्यावसायियांची मागणी होती. त्यापुष्ठ्यर्थ शॅकवाल्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक दिली. यावेळी आमदार मायकल लोबो हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते.
पर्यटन हंगाम सुरु होऊन दोन महिने होत आले तरी अजून किनाय्रांवर शॅक उभे राहू शकलेले नाहीत. आधीच पर्यटन खात्याने शॅकवांटपास विलंब लावला. त्यात भर म्हणून आता नवीन नियम लागू केले आहेत. पर्यटन खात्याने शॅकसाठी नवा प्लॅन आणला आहे. त्यानुसार शॅक उभारायचा झाल्यास प्रत्येकाला सुमारे १५ लाख रुपये खर्च येईल, असे व्यावसायिकांचे म्हणणे होते.
आमदार मायकल लोबो यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने वरील बाब मुख्यमंत्र्यांना पटवून दिली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना लोबो म्हणाले कि,‘ शॅक उभे राहिलेले नसल्याने विदेशी पर्यटकांना किनाय्रांवर रेतीमध्ये पहुडून ‘सन बाथ’ घ्यावा लागत आहे. आम्ही पर्यटकांना जर सोयी सुविध देऊ शकत नसू तर चुकीचा संदेश जगभरात जाईल. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटून मी डेक बेड घालून देण्याची व्यवस्था केली. परंतु शॅक अजून उभे न राहिल्याने पर्यटकांची गैरसोय झालेली आहे.’
दरवर्षी शॅक वांटपास विलंब होत असल्याने लोबो यानी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले कि, यामुळे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. सरकारने याकडे गंभीरपणे पहायला हवे. व्यावसायिकांनी शॅक उभारुनच भागणार नाही. त्यांना आता राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कन्सेंट टू एस्टाब्लिश व कन्सेंट टू ॲापरेट असे दोन परवाने लागतील. ते लवकर देण्याची व्यवस्था सरकारने करावी.’
दरम्यान,अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले कि, आधीच व्यवसायाचे दोन महिने वाया गेलेले आहेत. शॅक व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे सरकारने अंत पाहू नये.’