सूरज नाईकपवार, मडगाव: गाेव्यातील दक्षिण जिल्हयातील घोडेव्हाळ बेंदुर्डे येथे शनिवारी भीषण अपघातात ठार झालेल्या देवराज सातनी व हस्कु सातनी या सासरा व सुनेच्या मृतदेहावर आज सोमवारी शवचिकित्सा होउन नंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रकचालक राकेश गोरे याला न्यायालयात हजर केले असता, त्याला अधिक तपासासाठी दोन दिवसांची पाेलिस कोठडी देण्यात आली.
शनिवारी रात्री कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोडेव्हाळ येथे मंगळुरुहून कोल्हापूर येथे काजूच्या बिया घेउन जाणारा ट्रक दरीत कोसळला होता. या ट्रकमध्ये चालक , क्लिनरसह व पाच लहान मुलांसह एकूण बाराजण होते. यातील चारजणांवर सदया गोमेकॉत तर अन्य पाचजणांवर येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार चालू आहे.
मयताच्या मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर त्यांचा मृतदेह मृत देवराज याच्या अन्य एका मुलाच्या ताब्यात देण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली. तोही त्यांच्यासोबत या ट्रकमध्ये होता. सुदैवाने त्याला या अपघातात मोठी इजा पोहचली नाही,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व कुटुंब मूळ गुजरात राज्यातील असून, ते मंगळुरुहून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. फुगे विक्री करुन ते आपला उदरनिर्वाह करीत होते. मंगळुरुहून ते त्या ट्रकमध्ये चढले होते. तो ट्रक कोल्हापूर येथे पोहचल्यानंतर ते नंतर तेथून गुजरातला जाणार होते. ट्रकचालक राकेश याने गोव्याची सीमा ओलांडल्यानंतर दारु ढोसली होती. दारुच्या नशेत तो ट्रक चालवित होता. घोडेव्हाळ येथे पोहचल्यानंतर त्याचा वाहनावरील ताबा सुटला व त्याने सरळ तेथील कठडयाला धडक दिली व नंतर ट्रक १० मीटर खोल दरीत कोसळला होता.