म्हापसा: गोव्याबरोबर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगांव येथील श्री देवी लईराईचा जत्रोत्सव २४ एप्रिलपासून होणार आहे. त्यासाठी हजारो व्रतस्थ धोंड आज पासून उपवास करणार आहेत. हे व्रत काही धोंड तीन दिवसांचे तर काही धोंड पाच दिवसांचे करतात. हे व्रत गावागावातून पवित्र तलाव, , झरे, मंदिरे, धोंडांचे मंडप या ठिकाणी संबंधीत परिसरातील धोंड एकत्रित येऊन करतात. या दरम्यान पवित्र वातावरण असते. शेणानेसावरलेली जमीन, सोवळ््यात स्वयंपाक, उपवासाचे पदार्थ केले जातात. पदार्थाचे सेवन प्रत्येकवेळी आंघोळ केल्यानंतर ओल्यांनी केले जाते.
देवीचा जप नाम आरत्या भजने सतत सुरु ठेवली जातात. गावातील लोकही यात सहभागी होत असतात. जत्रे निमीत्त देवस्थान समितीकडून जोरात तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच प्रशासकीय स्तरावरही तयारी सुरु करण्यात आली आहे. जेत्रे निमीत्त लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन डिचोली तालुक्याच्या मामलेदारांनी अधिकारी तसेच देवस्थान समितीची संयुक्त बैठक घेऊन जत्रे संबंधीचा आढावा घेतला.