पणजी : बाबूश विरूद्ध पर्रीकर वादापासून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन हात दूरच राहणे पसंत केले आहे. या वादावर प्रतिक्रिया देण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. राजधानी शहरातील स्मार्ट सिटीची सर्व कामे येत्या ३० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मी दिलेले आहेत, एवढेच ते म्हणाले.
स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पणजीचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यावर हल्लाबोल केला होता. पर्रीकर यांनी २५ वर्षे राजधानी शहराची वाट लावली, असा आरोप करताना त्यांनी आणलेल्या सल्लागारांनी स्मार्ट सिटीच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खाल्ले, असा आरोपही बाबूश यांनी केला होता. पंचवीस वर्षात सल्लागारावर जेवढा खर्च केला तेवढ्या पैशात दोन पूल बांधता आले असते. पर्रीकरांनी साधे पदपथ बांधण्यासाठी ही सल्लागार नेमले, अशी टीकाही त्यांनी केली होती. शिवाय उत्पल यांनी वारशाने काही मिळेल म्हणून वाट पाहू नये. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत माझ्याविरुद्ध लढावे, असे आव्हानही दिले होते.बाबूशनी प्रथमच एवढ्या कठोर शब्दात दिवंगत पर्रीकर यांच्यावर हल्लाबोल केल्याने भाजपातही खळबळ माजली आहे.मुख्यमंत्र्यांची यावर प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला परंतु मुख्यमंत्र्यांनी यावर भाषण टाळले.
भाजप प्रवक्त्याकडून समाचारदरम्यान, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी बाबूशनी केलेल्या टिकेचा ट्विटरवर समाचार करताना घेताना 'जे टीका करत आहेत, त्यांनी पर्रीकर यांचे थोडे तरी गुण आत्मसात करावेत. पर्रीकरांनी नेहमीच लोकांप्रती त्याग भावना दाखवली. लोकांना गरज पडेल तेव्हा ते त्यांच्या मदतीला धावत असत. आधुनिक गोव्याचे खरे शिल्पकार होते', असे म्हटले आहे.
ते पुढे म्हणतात की,'दोन दशकात आमदार म्हणून पर्रीकर यांनी पणजीचा कायापालट केला. शहरातील रस्ते रुंद केले. आयनॉक्ससारखे सिनेमागृह उभे केले. शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या. पणजी शहर सुरक्षित बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पूर्वी राजधानी शहरात गॅंगवर होत होती, ती बंद केली. पर्रीकर यांचे काम काही ओळीत स्पष्ट करू शकत नाही. त्यांना प्रशासनाची उत्तम जाण होती टीका करणाऱ्यांनी हे समजून घ्यावे.'