गोवा- भाजपा नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगाट यांच्या खून प्रकरणाची चौकशी अखेर सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनाली फोगाटच्या नातेवाईकांकडून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यात येत होती.
सोनाली फोगट मृत्यू प्रकरण आम्ही आज सीबीआयकडे सोपवत आहोत. सुपूर्द करण्यासाठी मी गृहमंत्र्यांना पत्र लिहित आहे. आमचा आमच्या पोलिसांवर विश्वास आहे आणि ते चांगले तपास करत आहेत. मात्र सदर प्रकरण सीबीआयकडे सोपवा, अशी वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. देशाच्या सरन्यायाधीशांनाही सोनालीच्या नातेवाईकांनी साकडे घातले होते. सोनाली फोगाटच्या खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रमुख संशयितांपैकी एक असलेल्या सुधीर सांगवानला सरकार पाठिंबा देत असल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे. गोवा पोलिसांनी केलेला तपास केवळ निमित्तमात्र असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
२७ ऑगस्ट रोजी मालकाला अटक
गोवा पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजीच कर्ली क्लबच्या मालकाला अटक केली होती. यासोबत पोलिसांनी क्लबच्या बाथरुमधून ड्रग्ज देखील हस्तगत केले होते. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सोनाली फोगट प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट आणि कुटुंबीयांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सुधीर आणि सुखबिंदर यांना अटक केली. याच सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांच्यासोबत फोगाट २२ ऑगस्ट रोजी गोव्यात आल्या होत्या. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधूनही समोर आलं आहे.
सीसीटीव्ही फुटेज केलं जप्त
गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी याच क्लबमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केलं आहे. यात सुधीर एका बाटलीतून सोनाली फोगाट यांना काहीतरी पाजत असल्याचं दिसून आलं आहे. सोनाली फोगाट वारंवार नकार देत असतानाही बळजबरीनं त्यांना पाजण्यात येत असल्याचं फुटेजमध्ये आढळून आलं आहे. सोनाली यांना एमडीएमए ड्रग्ज दिला गेल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबतची वैद्यकीय टीमकडून चाचणी आणि तपास सध्या केला जात आहे.