सूरज पवार
हॉस्पिसियोच्या जुन्या इमारतीला एक इतिहास आहे. ही इमारत म्हणजे वारसा स्थळ असून त्याचे जतन व संवर्धन करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र हॉस्पिसियोच्या दुरुस्ती संदर्भात राज्य सरकार काहीही निर्णय घेत नाही. गेल्या तीन वर्षांपासुन तर या वारसा स्थळाला दुर्लक्षित करण्यात आले आहे असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
आंबेडकर जयंती दिनी सरदेसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मडगाव येथील हॉस्पिसियो इमारतीच्या भिंतीची रंगरंगोटी केली. या प्रसंगी सरदेसाई यांच्या पत्नी उषा सरदेसाई, गोवा फॉरवर्डचे नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी रंगरंगोटीत सहभागी झाले होते.
या संदर्भात बोलताना आमदार सरदेसाई .यानी सांगितले की, सरकाराचे या इमारतीकडे दुर्लक्ष म्हणजे अन्यायच आहे व अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्व होते. म्हणुन इमारतीच्या आवार भिंतीच्या रंगरंगोटीचे काम त्यांच्या जयंती दिनी आम्ही हातात घेतले आहे.
हॉस्पिसियोच्या दुरुस्तीचा प्रश्र्न विधानसभेतही काढला होता. पण विधानसभेचे अधिवेशनाचा अवधी ही सरकार वाढवू पहात नाही असेही सरदेसाई यानी सांगितले.
सरकार आरोग्य खात्याला पुरेसा आर्थिक निधी देत नसल्याची टीकाही सरदेसाई यांनी केली. पुरेसा आर्थिक निधी मिळत नसल्याने आरोग्य मंत्री विश्वजीत राणे तरी काय करणार असेही सरदेसाई यानी म्हटले. सद्याचे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितलाची हॉस्पिसियोपेक्षा वाईट आहे. त्यामुळे सरकाराने सर्व संबंधीतांना विश्र्वासात घेऊन हॉस्पिसियोच्या दुरुस्तीचे व जतनाची प्रक्रिया सुरु करावी. किंवा करीतास सारख्या संस्था जर आरोग्य केंद्र सुरु करुन त्याचे जतन करीत असेल तर त्यांना परवानगी द्यावी असेही सरदेसाई यानी सुचविले.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ उभारण्या मागे केवळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचा हेतू होता, मग तिथे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा विचार सरकार कसा काय करु शकते असा प्रश्र्नही सरदेसाई यानी उपस्थित केला.