म्हापसा : पेडणे येथील मोपा विमानतळाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याची तसेच नगरपालिका क्षेत्रातील दुकानांच्या भाडेवाढिवर सर्वमान्य तोडगा काढण्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
राष्ट्रीय व्यापारी कल्याण मंडळातर्फे व्यापारी संमेलनाचे म्हापशातील शिरसाट सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला त्यांच्या सोबत मंडळाचेअध्यक्ष सुनील सिंधी , भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे, उपसभापती जोशुआ डिसोझा, म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत, सचिव सिद्धेश राऊत तसेच मंडळाचे निमंत्रक आशिष शिरोडकर हे उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांच्यावतिने श्रीपाद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
व्यापाऱ्यांनी सादर केलेल्या विविध मागण्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतिने पावले उचलण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी पालिकांचे मुख्याधिकारी. पालिका प्रशासन संचालक व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन तोडगा काढला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. व्यापाऱ्यांना सतावणारा लीज करार नुतनीकरणाचा विषय ३१ मार्च सोडवण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिलेजाणार असल्याची माहिती दिली. तसेच लीज कराराच्या हस्तांतरणाच्या विषयावर संबंधित कुटुंबातील कोणाचाच आक्षेप नसल्यास तो ही विषय ३१ मार्च पर्यंत सोडवण्याचेआश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.
येथील शहराचा विकास आराखडा व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन केला जाईल. त्यासाठी पायाभूत महामंडळाच्या वतीने नेमण्यात आलेल्या सल्लागाराशी चर्चाकेली जाणार असून आवश्यकता भासल्यास नव्या सल्लागाराची नेमणुक करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. व्यापारी वर्गाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रीत येऊन काम करण्याचे आवाहन सुनील सिंधी यांनी यावेळी केले. यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, सदानंद तानावडे तसेच आशिष शिरोडकर यांनी आपले विचार मांडले.