पणजी: बाणास्तारी अपघाताचा तपास पारदर्शक व नि:पक्षपातीपणे होत नसल्याचा आरोप झाल्यानंतर अखेर सरकारने म्हार्दोळ पोलिसस्थानकाकडून काढून घेऊन तो गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे.
बाणास्तारी अपघाताचा तपास करण्यास म्हार्दोळ पोलिस असमर्थ ठरत आहेत. पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे , त्यासाठी सदर प्रकरणे गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवावे अशी मागणी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई व दिवाडीवासियांनी जुने गोवेत मोठया संख्येने जमून मेणबत्ती मोर्चाही काढला होता. आमदार फळदेसाईंनी मागणी संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती.
बाणास्तारी अपघातात तीन जण जागीच ठार झाले होते. यात फोंडा येथील अनुप कर्माकर या युवकासह दिवाडी येथील फडते दांपत्याचा समावेश आहे. तसेच तीन जण गंभीर जखमी झालेआहेत. मात्र म्हार्दोळ पोलिस हे अपघातास कारणीभूत ठरलेले मर्सिडीज गाडी चालक परेश सावर्डेकर व तेव्हा गाडीत असलेली त्याची पत्नी मेघना सावर्डेकर यांना वाचवत असल्याचा आरोप होत आहे.सध्या परेश हा १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत असून मेघना हिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
अपघातास घडला तेव्हा मर्सिडीज मधील लोकांना पोलिसस्थानकात नेण्याएवजी पोलिसांनी त्यांना सुखरुप घरी पाठवले. गाडी परेश नव्हे तर मेघना चालवत होती.असा दावा काही प्रत्यदर्शंनी केला होता. परंतु त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले असा आरोपही होत आहे.