वास्को : आयपीएल टी २० क्रिकेट सामन्यावर दक्षिण गोव्यातील आरोसी - कासावली येथील एका घरात सट्टा घेतला जात असल्याची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी गुरुवारी (दि. ४) रात्री छापा मारून दहा जणांना रंगेहात पकडले. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरू असलेल्या सामन्यावर सट्टा घेतला जात होता. शुक्रवारी (दि. ५) पहाटे कारवाई पूर्ण करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. टोळीकडून सट्टा घेण्यासाठी वापरलेले ३१ मोबाईल, ७ लॅपटॉप, ३ इंन्टरनेट राऊटर्स आणि इतर असे सुमारे १० लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.
अटक केलेले सट्टेबाज छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा आणि राजस्थानमधील आहेत. या टोळीने आरोसी येथे एक घर भाड्याने घेतले होते. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्राशियस, पोलीस उपनिरीक्षक संकेत तळेकर आणि पथकाने या घरात छापा मारला असता तेथे दहाजण क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असल्याचे दिसले. त्यांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी संशयितांविरोधात पीडीडीपीजी कायद्याच्या कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये नितीन सिंग (वय ३१), मितेश प्रधान (वय २३), नंदकीशोर साहू (३२, सर्व रा. छत्तीसगढ), सचिन सिंग (२४), सतरेंद्र कुमार सिंग (२७, दोघेही रा. उत्तर प्रदेश), सौरभ देशपांडे (२६, पुणे-महाराष्ट्र), सनी जैसवाल (३१, दिल्ली), सुनील कुमार राय (२७, ओडिशा), दलिप सिंग (वय २४) आणि किशन सिंग (२१, दोघेही रा. राजस्थान) यांचा समावेश आहे. वेर्णा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
आरोसी येथे छापा टाकला तेव्हा या संशयितांनी कोलकात्ता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यावर सट्टा घेतला होता. अटक केलेल्या या दहाजणांपैकी दोघांवर आसाममध्येही काही गुन्हे नोंद असून ते ‘वाँटेड’ यादीत आहेत. त्यांची माहिती आसाम पोलिसांना देण्यात आली आहे. आसाम पोलीस त्यांना तेथील गुन्ह्याच्या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात.- सलीम शेख, पोलीस उपअधीक्षक, मुरगाव