ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ दूधसागर नदीची पातळी कमी झाल्याचे लक्षात येताच पाणी पुरवठा सुरळीत व्हावा व लोकांची गैरसोय होऊ नाही म्हणून, जलस्रोत खात्यातर्फे बंद खाणीचे पाणी बुधवारी पासून नदीत सोडण्यास सुरुवात झाली आहे. सातोण - दाबाळ येथे एक पंप तर कोडली खाणीवर तीन पंप बसविण्यात आले आहेत. परिसरात बसवलेल्या सदर ४ पंपांमधून प्रतिदिन २० एमएलडी पाणी दूधसागर नदीत सोडण्यात येणार आहे.
ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्प हा फोंडा व तिसवाडी साठी वरदान ठरत आहे. दोन्ही तालुक्याना पाणी पुरवठा हा ओपा प्रकल्पातून केला जातो. गेल्या काही दिवसापासून दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याची समस्या निर्माण होण्याच्या मार्गावर होती. जलस्रोत खात्यातर्फे बंद खाणीमधून पाणी पुरवठा करण्यासाठी गेल्या २-३ दिवसापासून पंप बसविण्याची काम युद्ध पातळीवर सुरू झाले होते. सातोण - दाबाळ येथील झारापकर आणि पारकर खाण कंपनीच्या बंद खाणीचे पाणी पंप बसवून नदीत सोडण्याची प्रक्रिया बुधवारी सकाळी पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली. यावेळी धारबांदोडा तालुक्यातील जलस्रोत खात्याचे सहायक अभियंता सदानंद नाईक, कनिष्ठ अभियंता सागर नाईक, स्थानिक पंच भोला गावकर व रमाकांत गावकर यावेळी उपस्थित होते. सातोण येथील बंद खाणींचे पाणी नदीत सोडण्यास पंच सदस्य रमाकांत गावकर व भोला गावकर यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. ओपा प्रकल्पातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही वर्षापासून गांजे - उसगाव येथील म्हादई नदीचे पाणी पुरवले जात होते. परंतु यंदा कमी पाऊस पडल्यामुळे दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली होती. त्यामुळे जलस्रोत खात्याकडे बंद खाणीतील पाणी हा पर्याय होता. खाणीतून पामी सोडल्यामुळे ओपा प्रकल्पाची पातळी नियंत्रणात येईल.