वास्को: सहा महीन्यापूर्वी चिखली आणि दाबोळी अशा दोन ठीकाणी झालेल्या घरफोडी चोरीतील आरोपीला गजाआड करून चोरलेली ७ लाख १९ हजार ७५० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात वास्को पोलीसांना यश आले. सोमवारी (दि.६) उशिरा रात्री पोलीस गस्तीवर असताना दाबोळी येथील रस्त्याच्या बाजूतून जाणाऱ्या एका वृद्ध इसमाच्या चेहऱ्यावर पोलीस वाहनाच्या दिव्याचा प्रकाश पडला असता तो चोरी प्रकरणातील आरोपी असल्याचे पोलीसांसमोर उघड झाले. पोलीसांनी आपल्याला पाहील्याचे अमीर शेख (वय ६८) ह्या संशयित वृद्ध चोरट्याला कळताच त्यांनी पोबारा काढण्यासाठी झुडपी भागातून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र सुमारे दीड तासाच्या अथक शोधानंतर पोलीसांनी त्याला जयरामनगर, दाबोळी येथील झुडपी भागातून गजाआड केले.
७ मे रोजी चिखली येथील एका बंगल्यातून आणि २३ मे ते ३ जून ह्या काळात दाबोळी येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी घुसून चोरी केली होती. त्या दोन्ही चोरी प्रकरणात अज्ञात चोरट्यांनी तेथून रोख रक्कम, सोन्याचे दागीने, घड्याळे, विदेशी चलने इत्यादी मिळून सुमारे सात लाखाची मालमत्ता लंपास केली होती. पोलीसांनी दोन्ही चोरी प्रकरणात चौकशीला सुरवात केली असता त्यांना तेथून चोरीच्या वेळेची सी सी टीव्ही कॅमेरा फुटेज मिळाली. चिखली बंगल्यात झालेल्या चोरी प्रकरणात दोघे तर दाबोळी येथे झालेल्या चोरी प्रकरणात एका इसमाचा चेहरा पोलीसांना फुटेजमध्ये आढळून आला. दोन्ही चोरी प्रकरणात पोलीसांनी चौकशीला सुरवात केली, मात्र सहा महीन्यापासून त्यांना त्या प्रकरणातील आरोपींना गजाआड करण्यास यश आले नव्हते.
सोमवारी रात्री नेहमीसारखे वास्को पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने वाहनातून गस्तीवर होते. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक इत्यादी पोलीस गस्तीवर असताना ते दाबोळी परिसरात पोचले असता त्यांना रस्त्याच्या बाजूतून एक वृद्ध इसम हातात पिकास घेऊन चालत जात असल्याचे आढळून आले. वृद्ध इसमाच्या चेहऱ्यावर पोलीस वाहनाच्या दिव्याचा प्रकाश पडताच तो त्या दोन्ही चोरी प्रकरणा वेळीच्या सी सी टीव्ही फुटेजमध्ये होता याची आठवण गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक याला झाली. दिव्याचा प्रकाश आपल्यावर पडल्याने पोलीसांनी आपल्याला ओळखल्याची भिती वृद्ध चोरट्याला होताच त्यांने पळण्यासाठी तेथे असलेल्या झुडपी भागातून पळ काढली. मात्र पोलीसांनी सर्व बाजूने सापळा रचून त्याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली.
दिड तासाच्या शोध मोहीमेनंतर त्याला गजाआड करण्यास पोलीसांना यश आले. नंतर त्याला पोलीस स्थानकावर आणून त्याच्याशी कसून चौकशीला सुरवात केली. त्यावेळी त्याने त्याचा दोन्ही चोरी प्रकरणात समावेश असल्याचे पोलीसांसमोर कबूल केल्याची माहीती वास्को पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली. दोन्ही चोरी प्रकरणात शामील असलेल्या त्या संशयित वृद्ध चोरट्याचे नाव अमीर शेख (वय ६८) असे असून तो दक्षीण - पच्छीम दिल्लीतील मूळ रहीवाशी असल्याचे उघड झाल्याचे नायक यांनी सांगितले. चौकशीवेळी त्यांने थिवी येथे भाड्याने खोली घेतल्याची माहीती पोलीसांसमोर उघड करून तेथे चोरीचा माल ठेवल्याचे सांगितले. मंगळवारी पोलीस संशयित आरोपी अमीर शेख याला घेऊन ते त्याच्या थिवी येथील भाड्याने राहत असलेल्या खोलीवर जाऊन पोचले.
पोलीसांनी तेथे तपासणी केली असता दोन्ही चोरीतील सोन्याचे दागीने, रोख रक्कम, घड्याळे, विदेशी चलने इत्यादी चोरीला गेलेली मालमत्ता तेथे असल्याचे उघड झाले. पोलीसांनी नंतर कारवाई करून थिवी येथील अमीर शेख याच्या भाड्याने राहत असलेल्या खोलीतून ती चोरीची मालमत्ता जप्त केली. दरम्यान मंगळवारी पोलीसांनी अमीर शेख याला न्यायालयात उपस्थित केला असता त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश दिल्याची माहीती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली. दोन चोरी प्रकरणात शामील असलेला अमीर शेख हा वृद्ध चोरटा वास्को अथवा गोव्यातील अन्य कुठल्या चोरी प्रकरणात शामील आहे का त्याबाबतही पोलीस चौकशी करत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली.