पणजी : ‘ओला’ आणि ‘उबेर’ या कंपन्यांना निमंत्रित करून स्थानिक टॅक्सी व्यवसाय चिरडण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
वाहतूकमंत्री मॉवीन गुदिन्हो यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चोडणकर म्हणाले की, राज्यात पुरेशा टॅक्सी असूनही सरकार खाजगी कंपन्या आणण्यास का इच्छुक आहेत हा प्रश्नच आहे. गोव्यात स्थानिक टॅक्सी चालक आणि मोटरसायकल पायलट 'पाहुण्यांशी' आदराने आणि चांगल्या पद्धतीने वागण्यासाठी ओळखले जातात. खाजगी कंपन्यांचे चालक आणल्याने गोव्याचे नाव खराब होईल आणि स्थानिक टॅक्सी मालकांचा व्यवसाय देखील हिरावून घेतला जाईल. सरकारने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी टॅक्सी मालकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.’
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या मे महिन्यात आश्वासन दिले होते की ‘माझी’ योजना लागू केल्यानंतर २४ तास बसेस धावतील.ज्यामुळे पर्यटक आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना मदत होईल. आजपर्यंत ही सेवा का सुरू झाली नाही? असा सवाल चोडणकर यांनी केला.दिलेली आश्वासने पाळण्यात सरकार अपयशी ठरले असून केवळ नको असलेले प्रकल्प आणि धोरणे राज्यातील जनतेवर लादली जात असल्याचा आरोप चोडणकर यानी केला आहे.