पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: लाेकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैशांचे वाटप केले जात असल्याच्या संशयावरुन सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी पाठलाग करुन माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या भावाची गाडी आगशी येथे सोमवारी दुपारी भरारी पथकाला मिळवून दिली.
त्यामुळे एकच खळबळ उडाली. यावेळी भरारी पथकाने या गाडीची तपासणी केली. त्यात मतदारांना वाटण्यासाठीचे पैसे आढळून आले नाही. मात्र सदर गाडीच्या काचा या पूर्णपणे काळ्या असल्याने भरारी पथकाने इशारा दिला. तसेच गाडी जप्त करुन आगशी पोलिसस्थानकात पाठवली आहे.
आमदार बोरकर म्हणाले, की सांतआंद्रे मतदारसंघातील पालेम भागात माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचे भाऊ आंतोन सिल्वेरा हे त्यांच्या क्वालिस गाडीतून मतदारांना पैशांचे वाटप करीत असल्याची माहिती आपल्याला दुपारी १२.३० वाजता मिळाली. सदर गाडीच्या काचा या पूर्णपणे काळ्या होत्या. याची माहिती मिळताच आपण भरारी पथकाला फोन करुन कळवले. गाडी पालेम येथून गाडी पुढे जात असल्याने आपण त्याचा पाठलाग केला. गाडी आगशी येथे पोहचताच भरारी पथक दाखल झाले. त्यानंतर आपण भरारी पथकाच्या मदतीने ही गाडी अडवल्याचे त्यांनी सांगितले.