वास्को : दक्षिण गोव्यातील मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची रिक्त असलेली जागा भरण्यासाठी गुरूवारी (दि.१३) दुपारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा वेळ होता. मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक गीरीश बोरकर यांचा नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने शुक्रवारी (दि.१४) ते मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर बिनविरोध निवडून येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
गेल्या आठवड्यात लियो रॉड्रीगीस यांनी मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मुरगाव नगरपालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकात झालेल्या अलिखीत करारानुसार रॉड्रीगीस यांचा नगराध्यक्ष पदाचा एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सत्ताधारी गटातील दुसºया नगरसेवकाला नगराध्यक्ष बनवण्यासाठी मार्ग मोकळा करण्याकरिता रॉड्रीगीस यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी शुक्रवारी (दि.१४) पालिका सभागृहात बैठक बोलवली असून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांना गुरूवारी दुपारपर्यंत अर्ज भरण्याची वेळ दिली होती.
गुरूवारी नगरसेवक गीरीश बोरकर यांनी नगराध्यक्ष पादासाठी इच्छुक असलेला अर्ज मुख्याधिकारी जयंत तारी यांना सुर्पूद केला. नगराध्यक्ष पदासाठी बोरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने शुक्रवारी ते बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार असल्याचे निश्चित झाले आहे. शुक्रवारी सकाळी मुरगावचे नगराध्यक्ष निवडण्यासाठी ११ वाजता बैठक बोलवलेली असून तेथे निर्वाचन अधिकारी बोरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्याची घोषणा करणार आहेत. शुक्रवारी बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार असलेले नवीन नगराध्यक्ष गीरीश बोरकर हे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांचे खास समर्थक आहेत.