काशिराम म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: येथील राखणदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव बोडगेश्वर मंदिराची दुरुस्ती तसेच विस्तारीकरणासाठी बोलावण्यात आलेल्या महाजनांच्या विशेष आमसभेत देवस्थान समितीचा प्रस्ताव एक मताने फेटाळण्यात आला. श्री देव बोडगेश्वर मंदिराच्या सभागृहात ही बैठक काल रविवारी सकाळी देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर विस्तारीकरणाच्या एकमेव मुद्यावर बोलावण्यात आली होती.
ॲड. महेश राणे यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध करताना समितीच्या वतिने किती सदस्य विस्तारीकरणासाठी सहमत आहेत ते स्पष्ट करण्याची मागणी केली. समितीकडून उत्तर न मिळाल्याने राणे यांनी हाच प्रश्न महाजनांसमोर मांडला. यावेळी उपस्थित महाजनांनी प्रस्ताव मागे घेण्याची सुचना समितीला केली. समितीने प्रस्ताव मागे घेण्यास नकार दिल्यानंतर उपस्थित सर्व महाजनांनी प्रस्तावाला एकमताने विरोध करुन तो फेटाळून लावला.
देवस्थानात येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे. पर्यटक सुद्धा दर्शनासाठी येत असल्याने वाढलेली भक्तांची संख्या लक्षात घेऊन मंदिराचा विस्तार करून घेणे हाच मुळ उद्देश या प्रस्तावाचा होता. त्यामुळे हा प्रस्ताव महाजनांसमोर चर्चेसाठी मांडण्यात आलेला अशी माहिती अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी दिली. विस्तारासाठी सुमारे ७० लाख रुपये खर्च अपेक्षीत होता. अनेकांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले होते पण मांडलेला हा प्रस्ताव नामंजूर झाल्याने तो फेटाळण्यात आल्याचे भाईडकर म्हणाले. फक्त १३ महाजनच देवस्थानच्या कार्यात अडथळे निर्माण करतात असाही आरोप त्यांनी केला. सभेत आपले मत मांडण्याची संधी न देताच प्रस्ताव फेटाळण्यात आला असे ते म्हणाले.