समीर नाईक, पणजी: सांतीनेज येथील सार्वजनिक बांधकाम खाते ते शीतल हॉटेल हा रस्ता स्मार्ट सिटीच्या कामामुळे पुढील एक महिना बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास मंडळतर्फे शनिवारी नोटीस जारी करत याची माहिती दिली आहे. रोज या रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांनी या सूचनेची नोंद घ्यावी असे, आवाहन स्मार्ट सिटीतर्फे करण्यात आले आहे. सदर रस्त्यावर काँक्रिट टाकण्यात येणार असल्याने स्मार्ट सिटीने हा निर्णय घेतला आहे. पण असे असताना या मार्गावरील रेसिडेंशल कॉलनी, व येथे असलेल्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मुख्य रस्त्याच्या बाजूला पर्यायी मार्ग खुला करण्यात आला आहे. जेणेकरून येथील लोकांना त्रास होता कामा नये. पण हा खास मातीचा रस्ता केवळ येथील स्थानिकांसाठीच असणार आहे, असे स्मार्ट सिटीने आपल्या आदेशात म्हटले आहे.
आतापर्यंत हा रस्ता लोकांसाठी खुला होता आणि, शीतल हॉटेलच्या मागचा रस्ता जो आपटेश्वर मंदिर मार्गे मधुबन सर्कल पर्यंत पोहचणारा रस्ता होता तो कामामुळे बंद होता. पण आता हा बंद असणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पणजीत शिगमोत्सव असल्याने वाहनांचा अतिरेक भार आतील रस्त्यावर येणार आहे, याचाच विचार करत, ट्रॅफिक विभागतर्फे हा रस्ता खुला करण्यात यावा अशी विनंती स्मार्ट सिटीला केली होती, या विनंतीनुसार हा रस्ता शनिवारीच खुला करण्यात आला आहे.
सदर रस्ता खुला करण्यात आला असला तरी सांतीनेज येथील अनेक कामे अजून शिल्लक राहिली आहे. त्यामुळे येथे ये जा करताना लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील स्मार्ट सिटीतर्फे करण्यात आले आहे.