पणजी: झुवारी नदीवरील टोलेजंग खांबांच्यामध्ये शोभून दिसणाऱ्या केबल स्टे पुलाचे काम पूर्ण झाले असून पुलाच्या दुसऱ्या मार्गाचे उद्घाटन २२ डिसेंबर रोजी होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे.
दोन्ही बाजुंच्या उडाणपुलाचे जोडरस्ते आणि पूल मिळून एकूण १३.२ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प अडिच हजार कोटीहून अधिक खर्चाचा आहे. केवळ झुवारी नदीवरील पुलाचा खर्च हा ९३० कोटी रुपयांचा असून या आठपदरी पुलाची एक बाजू (एक पूल) यापूर्वीच पूर्ण होऊन वापरात आणला आहे. एक बाजू पूर्ण व्हायची असल्यामुळे पुलावरील वाहतुकीस काही निर्बंध घालण्यात आले होते. आता २२ डिसेंबर रोजी या दुसऱ्या बाजुचेही उद्घाटन होणार असल्यामुळे पुलावरील वाहतुकीचे बहुतांश निर्बंध हटविले जाणार आहेत.
वेर्णा जंक्शनवरूनही फ्लायओव्हर बांदण्याचा प्रस्ताव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतुक समस्या सुटणार आहे असे ते म्हणाले. अलिकडेच झुवारी पुलावरील काम पूर्ण करून भारचाचणीही घेण्यात आली होती. भार चाचणी यशस्वी झाल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली होती. त्यामुळे या पुलाच्या उद्घाटनाचे वेध सर्वांना लागले होते. नवीन वर्षाच्या स्वागताला देशभरातून अनेक लोक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गोव्यात येतात. त्यामुळे त्यापूर्वीच पुलाचे उद्घाटन करणे योग्य ठरणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.