प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांना कडवा प्रतिकार करण्यासाठी विरोधी पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. तरीही जो उमेदवार रिंगणात उतरवला जाईल, त्याला बार्देश तालुक्यातून लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
तालुक्यातील भाजपचे वर्चस्व पाहता तेवढ्याच तोडीने भाजपला उत्तर देण्यास तेवढ्याच सामर्थ्याचा उमेदवार रिंगणात उतरवल्यास अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. तसे झाल्यास भाजपला येत्या निवडणुकीसाठी व्यूहरचनेत फेरबदल करण्यास भाग पडणार आहे.
महिलांची मते ठरू शकतात निर्णायक तालुक्यातील एकूण मतदारांची संख्या १ लाख ९७ हजार ८४८ अशी आहे. सर्व सातही मतदारसंघांत सरासरी २७ हजार मतदार आहेत. त्यातील ९५,९७८ पुरुष तर १,०१,८९० महिला मतदार आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचा आकडा जास्त असल्याने त्यांची मते निर्णायक ठरू शकतात. नवमतदारांची संख्यासुद्धा बरीच वाढली आहे.
तिरंगी लढतीची शक्यता
तालुक्यातील एकूण चित्र पाहता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपच्या वतीने सलग सहाव्यांदा श्रीपाद नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आरजीच्या वतीने मनोज परब यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परब यांनी काही निवडक मतदारसंघातून आपला प्रचार सुरू केला आहे. मात्र, त्यांचा अपेक्षित प्रभाव अद्याप दिसून आलेला नाही. विरोधी आघाडी घटकांकडून काँग्रेसने अद्याप उमेदवारीवर कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्या उमेदवाराची प्रतीक्षा मतदारांना लागून राहिलेली आहे.
सायलंट व्होटरचा प्रभाव कुणावर?
निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भाजपकडून तालुक्यातील विविध मतदारसंघांत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी कल्याणकारी कार्यक्रमांच्या आयोजनावर भर दिला. सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्यावर भर दिला आहे. त्यासाठी गट संघटना सक्रिय केल्या. पण, त्यातून म्हणावा तसा प्रभाव मतदारांवर टाकण्यास पक्षाला अपयश आले. तालुक्यातील बऱ्याच भागांत आजही मूलभूत अर्थात वीज, पाणी, रस्ते यांसारख्या समस्यांवर झालेल्या दुर्लक्षामुळे मतदारांत नाराजीचा सूर आहे. सरकारी आश्वासने फक्त कागदोपत्री राहिल्याची, बेरोजगारांकडे, वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका लोकांकडून केली जात आहे.
काँग्रेस उभारी घेणार का?
सरकारविरोधात मतदारांच्या मनात निर्माण झालेल्या नाराजीचा लाभ विरोधकांकडून उठवला जाऊ शकतो का, असा प्रश्न आहे. हळदोणा मतदारसंघाचे आमदार कार्ल्स फेरेरा वगळता काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारा सक्षम नेता पक्षाजवळ नाही. जे नेते सध्या पक्षाची धुरा तालुक्यातून सांभाळून आहेत, त्यांच्यात इतर नेत्यांना एकत्रित आणून पक्षाचे कार्य पुढे नेण्याची क्षमता नाही. त्यामुळे या पक्षाचे कार्य विस्कटलेल्या अवस्थेत आहे. विस्कटलेली ही घडी व्यवस्थित झाल्यास एकंदरीत तालुक्यातून खरी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर तालुक्यातील ३ आमदारांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपत प्रवेश केला. त्यामुळे या पक्षावर त्याचे मोठे परिणामही झाले.
...हे दुर्लक्षून नाही चालणार
किनारी भागातील पारंपरिक घरांचा प्रश्न, विदेशी पर्यटकांनी गोव्याकडे फिरवलेल्या पाठीमुळे व्यवसायावर झालेले परिणाम तसेच वाढता ड्रग्सचा प्रश्न यामुळेही मतदारांत नाराजीचा सूर आहे. वाढलेली गुन्हेगारीसुद्धा नाराजीला कारण ठरत असल्याचेही आढळून येत आहे.