पणजी: पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोवेकरांना केरळ मधील मान्सून गोव्यात पोहोचेपर्यंत कडक गरमीला सामोरे जावे लागणार आहे. शुक्रवारी 35. 8 अंश सेल्सिअस इतके तापमान वाढले होते तर येत्या पाच दिवसात ते 37°c पर्यंत जाण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
शुक्रवारी तापमान प्रचंड वाढले होते. 35.8 अंश सेल्सिअस इतके तापमान अलीकडे कधी झाले नव्हते. या दिवसात तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता परंतु हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा २.८ अंश सेल्सियसने अधिक तापमान वाढले आहे. तसेच सापेक्षिक आद्रताही ७९% इतकी राहिली आहे त्यामुळे असह्य उखाड्याला लोकांना सामोरे जावे लागत आहे.
वास्तविक मान्सून केरळ मध्ये स्थिरावल्यामुळे दक्षिण भारतात तापमान उतरेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता आणि त्याचा परिणाम गोव्यासह किनारपट्टीतील राज्यांतही होणार असेही म्हटले होते. अरबी समुद्रावरील वातावरण हे मान्सूनसाठी अत्यंत पोषक असल्याचे म्हटले होते. परंतु अजून तापमान उतरलेले दिसत नाही किंबहुना ते वाढले आहे.
पुढील पाच दिवसात परिस्थिती आणखी बिकट होण्याचे संकेत आहेत. कारण 37 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मान्सून ३ जून पर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे.