किशोर कुबल,पणजी : राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनात तीव्र केल्यानंतर सरकारने अखेर सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासाची निविदा काढली आहे.
कृषी संचालनालयाने ही निविदा डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट ॲंड ट्रान्सफर या तत्वावर काढली आहे. इथेनॉल उत्पादन प्रकल्पाच्या स्थापनेसह विद्यमान संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी ही निविदा आहे. विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०२४ आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने आंदोलकांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेले पाच दिवस आंदोलन चालू होते. काल रात्री राजधानी पणजी शहरात धडक देऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला असता काही जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी नंतर मुक्त केले होते. काल आंदोलकांनी पणजीतच रात्र काढली.