वास्को: दोन महीन्यापूर्वी झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपीला गुरूवारी (दि.२७) वास्को पोलीसांनी अटक केली होती, मात्र काही तासातच त्या चोरट्यांने पोलीसांच्या हाती तुरी देऊन तो फरार झाला. चोरी प्रकरणात अटक केलेल्या पी रमेश (वय ५०) याला वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात नेले असता शुक्रवारी (दि.२८) पहाटे त्यांने त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी पाठवलेल्या दोन पोलीस शिपायांच्या गाफीलपणाची संघी साधून तो फरार झाला.
पहाटे ३ च्या सुमारास फरार झालेला आरोपी पी रमेश शुक्रवारी संध्याकाळ पर्यंत पोलीसांच्या हाती लागलेला नसून त्याला पकडण्यासाठी पोलीसांनी ‘लूक आउट नोटीस’ पण जारी केली आहे.वास्को पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार पी रमेश ह्या आरोपीला गुरूवारी चोरी प्रकरणात अटक केली होती. २३ फेब्रुवारी रोजी वास्कोत उभ्या करून ठेवलेल्या एका चारचाकीच्या दरवाजाची काच पी रमेश यांने फोडून चारचाकीतील अडीच लाखाची रोख रक्कम चोरून तो फरार झाला होता. त्या चोरी प्रकरणात पोलीसांनी भादस ३७९, ४२७ कलमाखाली गुन्हा नोंद करून दोन महीन्यापासून पोलीस पी रमेश याचा शोध घेत होती.
ज्या व्यक्तीच्या चारचाकीतून पैसे चोरीला गेले होते त्याच्याच मदतीने गुरूवारी पोलीसांना चोरी प्रकरणातील संशयित आरोपी पी रमेश याला अटक करण्यात यश प्राप्त झाले होते. अटक केलेल्या पी रमेश या संशयित आरोपीला गुरूवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात पाठवले होते. चिखली उपजिल्हा इस्पितळात ‘एक्स रे’ काढणे शक्य नसल्याने नंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात पाठवले.
वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलेल्या पी रमेश वर पाळत ठेवण्यासाठी वास्को पोलीस स्थानकावरील दोन पोलीस शिपायांना पाठवले होते. गोमॅकॉ इस्पितळात पी रमेश याची तपासणीची प्रक्रीया चालू असताना शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास त्यांने त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी पाठवलेल्या दोन्ही पोलीस शिपायांच्या हाती तुरी देऊन तो फरार झाला.
चोरी प्रकरणात अटक केलेला संशयित आरोपी पी रमेश पोलीसांच्या ताब्यातून गोमॅकॉ इस्पितळातून फरार झाल्याची माहीती उघड होताच त्याचा शोध घेण्यास सुरवात झाली. तसेच त्याला गजाआड करण्यासाठी पोलीसांनी ‘लूक आऊट नोटीस’ जारी आहे. शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास फरार झालेला संशयित आरोपी पी रमेश १२ तासाहून जास्त वेळ उलटला तरी पोलीसांच्या हाती लागला नसल्याची माहीती शुक्रवारी संध्याकाळी प्राप्त झाली. पी रमेश ह्या संशयिताला पुन्हा गजाआड करण्यासाठी पोलीस सर्व मार्गाने त्याचा शोध घेत आहेत.