वास्को: १ फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दल ४८ वा स्थापना दिवस साजरा करणार आहेत. त्यानिमित्ताने भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा विभागाने मंगळवारी (दि.३०) आयोजित केलेल्या ‘फेमीली डे ॲट सी’ कार्यक्रमात तटरक्षक दलाच्या ५०० अधिकारी - जवानांच्या कुटूंबियांनी भाग घेतला. तटरक्षक दलाच्या जहाजातून समुद्रात गेल्यानंतर खोल समुद्रात सुरक्षेच्या दृष्टीने तटरक्षक दलाचे अधिकारी - जवान कशा प्रकारे कार्यरत असतात त्याच्या दाखवलेल्या थरारक प्रात्याशिकांचे दर्शन ह्या कार्यक्रमातून झाले.
मंगळवारी मुरगाव बंदराच्या क्रुज जहाज धक्यावरून भारतीय तटरक्षक दलाच्या आयसीजीएस सुजित, आयसीजीएस विक्रम, आयसीजीएस अपूर्वा, आयसीजीएस अमल आणि आयसीजीएस सी - १८५ जहाजातून भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकारी - जवानांची कुटूंबे आणि इतर मान्यवर खोल समुद्रात गेल्यानंतर त्या कार्यक्रमाची सुरवात झाली. तटरक्षक दलाच्या जहाजातून खोल समुद्रात नेल्यानंतर चार तासाच्या दौऱ्या दरम्यान तटरक्षक दल खोल समुद्रात सुरक्षेसाठी कशा प्रकारे काम करतात त्याची प्रात्याशिके सादर केली. समुद्रात अन्य कुठल्याही जहाजाला आग लागल्यास तटरक्षक दलाचे अधिकारी ती कशा प्रकारे आटोक्यात आणते, समुद्रात शोध आणि बचाव मोहीम कशा प्रकारे केली जाते, समुद्रात एखाद्या जहाजावर बेकायदेशीर हालचाली होत असल्याचे आढळल्यास त्या जहाजाला रोखून कशा प्रकारे तपासणी केली जाते, समुद्रात शत्रूच्या जहाजावरून धोका असल्याचे आढळल्यास प्रतिउत्तराने कशा प्रकारे गोळीबार केली जाते अशा प्रकारची विविध प्रात्याशिके ह्या कार्यक्रमातून दाखवण्यात आली.
भारतीय तटरक्षक दलाच्या चेतक हॅलिकोप्टरने त्यांच्याकडून खोल समुद्रात सुरक्षेच्या दृष्टीने कशा प्रकारे काम केले जाते त्याची थरारक प्रात्याशिके सादर केली. चेतक हेलिकोप्टरमधून शोध आणि बचाव मोहीम, शत्रू जहाजाला रोखण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या त्वरित पावलांची थरारक प्रात्याशिके पहायला मिळाली. यावेळी भारतीय नौदलाच्या मीग २९ लढाऊ विमानांनी थरारक प्रात्याशिके सादर केली. खोल समुद्रात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला (सबमरीन) पाहण्याची संधी प्राप्त झाली. ‘अ फेमीली डे ॲट सी’ कार्यक्रमानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा विभागाचे प्रमुख डीआयजी अर्नभ भोस यांनी १ फेब्रुवारीला साजरा होणार असलेल्या तटरक्षक दलाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.
भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी - जवान जहाजावर खोल समुद्रात कशा प्रकारे सुरक्षेच्या दृष्टीने काम करतात ते पाहण्याची संधी ह्या कार्यक्रमातून त्यांच्या कुटूंबियांना मिळाल्याचे सांगितले. सामान्य दिवसात भारतीय तटरक्षक दलातील अधिकारी - जवानांच्या कुटूंबियांना जहाजावर जाण्याची संधी मिळत नाही. दरवर्षी तटरक्षक दलाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने ‘अ फेमीली डे ॲट सी’ कार्यक्रम आयोजित केला जात असून दलातील अधिकारी - जवानांच्या कुटूंबियांना आणि मान्यवरांना ही संघी मिळावी ह्या उद्देशानेच वर्षातून एकदा हा कार्यक्रम आयोजित केला जातो. ह्या कार्यक्रमात अनेक लहान मुले सहभागी झाले असून त्यांना अशा कार्यक्रमातून देश सेवेसाठी तटरक्षक दल अथवा अन्य संरक्षण दलात जुळण्याचे मोठे प्रोत्साहन मिळते असे ते म्हणाले.