मडगाव: गोव्यातील मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाजवळून अपहरण केलेल्या त्या दोन महिन्याच्या बालिकेचा शोध काढून अपहरणकर्ता महिलेच्या मडगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या. नतालिना आल्मेदा (५२) असे संशयिताचे नाव आहे.
ती मूळ गोवा वेल्हा येथील असून, सदया शांतिनगर येथे रहात होती. मंगळवारी रात्री पोलिसांनी तिला जेरबंद केले. पुढील पोलिस तपास चालू असल्याची माहिती मडगावचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली. साेमवार दि. १९ रोजी त्या दोन महिन्याच्या बालिकेचे अपहरण झाले होते. या प्रकरणी तिच्या आईने नंतर पोलिसांत तक्रार केली होती. हे कुटुंबीय मूळ मुंबईतील चेंबुर येथील असून, ते येथील कोकण रेल्वे स्थानकाजवळील फुटपाथजवळ आसरा घेउन होते.
भादंसंच्या ३६३ व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गंत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते. संशयिताचा पती वारला आहे. तीची मुलेही तीच्याबरोबर रहात नाहीत. त्या बालिकेला मला दया त्याचा मोबादला देउ असे सांगून तिने त्या कुटुंबियांना काही रक्कम देते असेही सांगितले होते. मात्र त्यास नकार देण्यात आला होता.
सोमवारी दुचाकीवरुन येउन संशयिताने त्या बालिकेचे अपहरण केले होते. पोलिसांत तशी तक्रार नोंद झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नाईक, उपनिरीक्षक दामोदर शिरोडकर, विश्वजीत ढवळीकर, समीर गावकर, निलेश शिरवईकर, सहायय्क पोलिस उपनिरीक्षक एन. शमीर, हवालदार शेखर सावंत, गोरखनाथ गावस , पोलिस शिपाई रिझवान शेख व सुभानी शेख यांनी तपासकाम सुरु करुन संशयिताला अटक केली व त्या बालिकेची सुटका केली.