काशिराम म्हाबरे, म्हापसा: शुल्लक बाचाबाचीवरून झालेल्या वादाचे रुपांतर भांडणात होऊन मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अनिल रामा गुणपत्रे (५६, खोर्ली-म्हापसा) यांचे मंगळवारी गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मारहाणीचा प्रकार म्हापसा येथील टॅक्सी स्टॅण्डजवळील रस्त्यावर घडलेला.
याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी याआधीच संशयित हिमांशू पटवाल (३३, उत्तराखंड) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली होती. घटनेच्या दिवशीच संशयिताचे मानसिक संतुलन ठिक नसल्याने म्हापसा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बांबोळी येथील मनोरूग्णालयात दाखल केले होते. आणि दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी त्याला रितसर अटक केली होती.
सदर मारहाणीची घटना दि. १६ नोव्हेंबर सांयकाळी उशिरा घडली होती. संशयित हिमांशू हा मडगावात एका हॉटेलमध्ये काम करायचा. त्या दिवशी तो म्हापशात आला होता. तो दारुच्या नशेत होता. याच नशेत संशयिताने क्षुल्लक कारणावरून गुणपत्रे यांच्याशी वाद घातला आणि त्यांना रस्त्यावरच लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली होती. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पण, प्रकृती खालावल्याने त्यांना नंतर गोमेकॉत हलविले. आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी आधी या प्रकरणी संशयित हिमांशू याच्या विरोधात भादंसंच्या कलम ३०७ अंतर्गत जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला होता. आता ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंद केला.