पणजी: दोनापावला येथे डॉ. संजय खोपे यांच्या बंगल्यात सुमारे ४५ लाख रुपयांची चोरी करणाऱ्या सुरेदर छेत्री (३१, पश्चिम बंगाल) याच्या मुसक्या पणजी पोलिसांनी पश्चिम बंगाल येथे आवळल्या.तो मुळ नेपाळ येथील आहे. त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडीत मिळाली आहे.
सदर चोरीची घटना ही ३१ जुलै रोजी घडली होती. यात संशयित छेत्री यांनी ४० लाख रुपयांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने तसेच ५ लाख रुपये रोख मिळून ४५ लाखांचा ऐवज चोरला होता. यापैकी काही ऐवज मालाड, मुंबई येथून जप्त करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वालसन यांनी दिली.
सदर संशयित हा कपडयाचे चेहरा झाकून सायकलने येयचा व घरांना टार्गेट करायचा. सदर संशयित हा कॅसिनोतही जात असे. तसेच तो इन्स्टाग्रामवरही ॲक्टिव्ह आहे. त्यानुसार पोलिसांनी बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केला व सदर संशयिताशी संपर्क साधला. यासाठी एका युवतीची मदत घेतली. तीन ते चार दिवस संशयिताशी इन्स्टाग्रामवर चॅट केल्यानंतर त्यांनी आपला खरा पत्ता व मोबाईल क्रमांक सांगितले. त्यानुसार त्याला ट्रॅक केले व पश्चिम बंगाल येथे जावून त्याला अटक केली.
सदर कारवाई ही पणजी उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली,पणजी पालिस निरीक्षक निखील पालयेकर व पोलिस उपनिरीक्षक संकेत पोखरे यांच्या पथकाने केली.