मडगाव : माजोर्डा येथील एका बंगल्यात अज्ञातांनी चोरी करून हिरेजडित सुवर्णालंकार व रोकड मिळून अंदाजे १४ लाखांचा ऐवज लंपास केला. आश्विनकुमार सरीन यांनी या प्रकरणी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भादंसंच्या ३८0 कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदविले आहे़ सरीन हे मूळ आग्रा येथील असून, दहा वर्ष ते माजोर्डा येथे भाड्याच्या घरात राहात होते. सरीन हॉटेल व्यावसायिक असून, अधूनमधून ते व्यवसायानिमित्त गोव्यात ये-जा करायचे. बेताळभाटी येथे त्यांनी एक हॉटेल विकत घेतले आहे़ त्या हॉटेलच्या नूतनीकरणाचे काम चालू आहे. हे हॉटेल सुरू झाल्यानंतर गोव्यात कायमचे राहायचा बेत सरीन यांनी आखला होता. शुक्रवारी सरीन यांच्या पत्नी निर्मला या रेल्वेने आग्राहून गोव्यात आल्या होत्या. तर सरीन हे शनिवारीच गोव्यात पोहचले होते. हॉटेलचे नूतनीकरणाचे काम चालू असल्याने गोव्यातच काही काळ राहावे लागणार असल्याने आग्रा येथील बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने घेऊन निर्मला आल्या होत्या. सोमवारी (दि.२७) हे दागिने येथील बँकेच्या लॉकरमध्ये त्या ठेवणार होत्या. मात्र, चोरट्यांनी या दागिन्यांवर डल्ला मारला. सरीन हे माजोर्डा येथील भाड्याच्या घरात पहिल्या मजल्यावर राहात होते. रात्री सर्वजण झोपी गेले असता ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़ सरीन यांच्या घराच्या बेडरुमचा स्लाइडिंग दरवाजा उघडाच होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. त्यामुळे चोरट्यांचे आयतेच फावले. बेडरुममधील कपाट फोडून चोरट्याने हिरेजडित दागिने व एक लाख रोख चोरून नेली. ज्या बॅगेतून निर्मला यांनी दागिने आणले होते त्याच बॅगमधील दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. सरीन दाम्पत्य सकाळी सात वाजता उठल्यानंतर त्यांना चोरीबाबत काहीच कल्पना नव्हती. सरीन यांच्या पत्नीने पर्समधील तीन हजार रुपये काढण्यासाठी पर्स उघडली असता, त्यांना आतील रक्कम गायब झाल्याचे दिसून आले. नंतर त्यांना बेडरुमधील कपाटही फोडल्याचे दिसल्याने चोरीची ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाताच कोलवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उपअधीक्षक दिनराज गोवेकर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
माजोर्डात १४ लाखांची चोरी
By admin | Published: July 27, 2015 2:05 AM