लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : गस्तीवर असलेल्या पोलिसांना मध्यरात्री तीनच्या सुमारास मारुती मंदिरासमोरून दोन अल्पवयीन मुले रस्त्याने चालत जाताना दिसली. संशय आला म्हणून पोलिसांनी त्यांना अडवले. चौकशी केली. खबरदारी म्हणून त्यांचे फोटो काढून घेतले. हे फोटोच बाजारपेठेतील नास्नोडकर ज्वेलर्समध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यास महत्त्वाचा दुवा ठरले.
पोलिसांनी अजमेर (राजस्थान) येथून चौघांना ताब्यात घेवून येथे आणले. त्यांच्याकडून एक किलो सोने आणि १२ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पणजी येथील पोलिस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दरम्यान, सीसीटीव्हीतून शनिवारी अलर्ट मिळवूनही सराफ व्यावसायिकाने केलेले दुर्लक्ष भोवल्याचे उघड झाले आहे. संशयित हरजी चौहान (२६, राजस्थान), भवानी सिंग (१८, राजस्थान) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. अन्य दोन संशयित अल्पवयीन आहेत. या प्रकरणी संशयितांची चौकशी केली जात आहे. चोरट्यांकडून बहुतांश दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
अधीक्षक कौशल म्हणाले, की म्हापसा पालिका मार्केटमध्ये चंद्रमोहन नास्नोडकर यांच्या दुकानात रविवारी दि. २२ रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. दुकानाचे ग्रील्स काढून चोरटे आत शिरले. त्यांनी दुकानातील सोन्याची बिस्किटे, सोन्याचे घड्याळ तसेच अन्य दागिने आणि चांदीचे दागिने लंपास केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही चोरी दिसून आली होती. चोरट्यांनी आपला चेहरा कापडाने झाकला होता. त्यामुळे कॅमेऱ्यात चेहरा अस्पष्ट होता.
म्हापसा बाजारपेठेतील नास्नोडकर ज्लेलर्समधील चोरीचा छडा खास पथकाने लावला. यावेळी उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक निखिल पालेकर व इतर उपस्थित होते. या प्रकरणातील दोन्ही अल्पवयीन चोरट्यांची स्वानगी मेरशी येथील अपना घरात करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि परिणामकारक नाइट पेट्रोलिंग यामुळे चोरांना पकडण्यास पोलिसांना यश प्राप्त झाले. समावेश असलेली तीन पथके तीन राज्यांत तपास करत होती. मात्र, हे चोरटे चौथ्या राज्यात सापडले.
बेफिकीरी भोवली...
चोरट्यांनी दुकानालगतच्या खांबावरून छप्परावर चढून तेथील खिडकी तोडून पहिल्या मजल्यावरून दुकानात प्रवेश केला होता. ही चोरीची घटना रविवारी मध्यरात्री घडली तरी तत्पुर्वी दोन दिवसांपासून चोरट्यांनी लोखंडी खिडकी तोडण्यास सुरुवात केली होती. दुकानात सीसीटिव्ही असल्याने खिडकी तोडण्याच्या प्रकाराचा अलर्ट दुकानदाराला मोबाईलवरून गेला, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे निष्पन्न झाले आहे.
उपनिरीक्षकाची चतुराई
गस्तीवर असलेल्या म्हापसा पोलिस स्थानकातील उपनिरीक्षक विशाल कुट्टीकर यांनी दाखवलेली चतुराई मोलाची ठरली. चोरीनंतर संशयित चालत मारुती मंदिर परिसरापर्यंत आले. गस्तीवर असलेल्या उपनिरीक्षक कुट्टीकर यांनी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांची विचारपूस केली. त्यांना दोघेही अल्पवयीन असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी दोघांना जावू दिले. त्याआधी कुट्टीकर यांनी दोन्ही मुलांचे फोटो मोबाईलवर टिपले होते. चौकशीवेळी हे फोटो आणि सीसीटीव्हीत आढळलेले चोरटे यात साम्य असल्याचे आढळून आले. हे फोटो तपासात महत्त्वाचा दुवा ठरले. कुट्टीकर यांनी दाखवलेल्या सतर्कतेबाबत उपअधिक्षक संदेश चोडणकर आणि निरीक्षक निखील पालेयकर यांनी त्याची प्रशंसा केली आहे.
मोबाइलसुद्धा टाळला
एरव्ही चोरटे हॉटेलात राहून परिसराची रेकी करतात. मात्र या चोरट्यांनी हॉटेलमध्ये थांबण्यास ओळखपत्र द्यावे लागणार म्हणून तेथे थांबलेच नाहीत. आपले लोकेशन टाळण्यासाठी त्यांनी मोबाईलचा वापर केला नाही. पोलिसांच्या चौकशीत संशयितांकडे मोबाईलसुद्धा आढळून आला नव्हता.