पंकज शेट्ये
वास्को - वास्को शहरात पुन्हा एकदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्यास सुरू झाली आहे. गेल्या तीन महीन्याच्या काळात वास्कोतील विविध आस्थापनातून अज्ञात चोरट्यांनी सामान तसेच रोख रक्कम मिळून 35 लाख रुपयांची मालमत्ता लंपास केली आहे. तसेच या काळात अज्ञात चोरट्यांनी एक मोबाईल शोरुम आणि वास्को शहरातील सहा आस्थापन कार्यालये फोडून मालमत्ता लंपास केली. चोरी प्रकरणातील चोरट्यांना गजाआड करण्यास वास्को पोलिसांना यश आलेले नाही.
वास्को शहरात चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन महीन्यापूर्वी (16 जुलै) वास्को शहरात असलेल्या ‘एम झोन सॅमसंग मोबाईल शोरुम’ मध्ये चोरट्यांनी हात साफ करून येथील 30 लाख रुपयांचे मोबाईल तसेच र्स्पोट्स घड्याळे लंपास केल्याची घटना घडल्याने शहरात असुरक्षतेचे वातावरण पसरले. गोवा शिपयार्ड जवळ असलेल्या या मोबाईल दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी वाकवून आत प्रवेश केल्याचे तपासाच्या वेळी उघड झाले होते. या चोरी प्रकरणात तपास करत असताना सदर चोरी एका बिहारी गँगने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
21 सप्टेंबरला शहरातील स्वतंत्र पथ मार्ग रस्त्यावरील ‘रोहन आरकेड’ इमारतीतील तीन कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी घुसून येथील 3 लाख 60 हजार रुपयाची रोख रक्कम लंपास केल्याचे उघड झाल्याने शहरात चोरीच्या प्रकरणात वाढ झाली. इमारतीत असलेल्या ‘नासेक कन्सलटन्सी’, ‘मरिनलिंक शिपींग एजन्सी’ या कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे टाळे तोडून तर ‘एस.जी.हेगडे टॅक्स कन्सलटन्सी’ कार्यालयाच्या शौचालयाच्या खिडकीचे गंज कापून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केल्यानंतर चोरी केल्याचे तपासाच्या वेळी समोर आले होते.
वास्कोत वाढत असलेल्या चोरी प्रकरणांमुळे लोकांमध्ये भीती निर्माण होत असतानाच शुक्रवारी (19 ऑक्टोबर) शहरात येणाऱ्या रस्त्यावर असलेल्या ‘कर्मा हाईट्स’ इमारतीत असलेली तीन कार्यालये अज्ञात चोरट्यांनी फोडली. 1 लाख 34 हजार रुपयांची मालमत्ता लंपास केले. तसेच ‘विलीयमसन मरीटाइम’ व ‘शेख राणा अॅण्ड सन्स’ या कार्यालयातील 1 लाख 34 हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
गेल्या तीन महीन्यात शहरात वाढत असलेल्या या चोरी प्रकरणात टोळीचा हात असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील चोरट्यांना गजाआड करण्यास पोलिसांना यश आलेले नाही. मागच्या तीन महीन्यात झालेल्या या चोऱ्या रात्रीच्या वेळी घडलेल्या असल्यामुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या पोलिसांच्या गस्तीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वास्कोत वाढत असलेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून पोलिसांनी योग्य ती पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.