मडगाव - संततधार पडत असलेल्या पावसाचा फायदा घेऊन गोव्यात चोरट्यांनी थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. किटल-फातर्पा येथील श्री शांतादुर्गा किटलकरीण देवस्थानात रविवारी (21 जुलै) रात्री चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करत देवळातील दोन दानपेट्या पळविल्याची घटना समोर आली आहे. तसेच देवीला दान केलेल्या दोन सोनसाखळ्याही चोरुन नेल्या आहेत. एकूण ऐवज हा एक लाख रुपये किमतीचा असण्याची शक्यता देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे.
रविवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. देवळाच्या खिडकीचे गज वाकवून चोरटे आत शिरले. त्यांनी देवळातील दानपेट्या पळविल्या आहेत. देवळापासून काही अंतरावर त्या फोडून त्यातील पैसे लंपास केले. त्याशिवाय देवळातील कपाटात दोन सोनसाखळ्या होत्या त्याही चोरुन नेल्या आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कुत्र्याचा वापर केला. मात्र पावसाच्या पाण्यामुळे कुत्र्याला चोरट्यांचा माग मिळू शकला नाही अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष उदय देसाई यांनी दिली आहे.
सोमवारी सकाळी पुजाऱ्याच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी देवस्थान समितीला त्याबाबत माहिती दिली. हे देऊळ मुख्य रस्त्यापासून थोडेसे आतील भागात असल्याने या चोरीचा कोणालाही सुगावा लागू शकला नाही. देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मागच्या मार्च महिन्यात या दान पेटीतील पैसे काढून ते बँकेत जमा केल्यामुळे आता केवळ 20 हजाराच्या आसपास रक्कम दानपेटीत असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्याशिवाय चोरीला गेलेल्या दोन सोनसाखळ्यांची किंमत 80 हजाराच्या आसपास असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. चोरीची घटना घडल्यानंतर ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी सापडलेल्या ठशांचे नमुने घेतले. नऊ वर्षापूर्वी याच मंदिरात अशीच चोरी होऊन सुमारे 8 लाखांचा ऐवज चोरुन नेला होता. त्यानंतर महाजन समितीने देवीचे ऐवज देवळात ठेवण्याऐवजी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या चोरीत चोरट्यांच्या हाती फारसे काही लागू शकले नाही असे त्यांनी सांगितले.