वास्को: दक्षिण गोव्यात असलेल्या कुठ्ठाळी तसेच साकवाळ अशा दोन जवळपासच्या भागातील सेंट फीलीप अॅण्ड जेंम्स चर्च तसेच गणपती मंदीरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. सेंट फीलीप अॅण्ड जेंम्स चर्चच्या कार्यालयाच्या दरवाजाचे टाळे चोरट्यांनी तोडून प्रवेश केल्यानंतर येथे असलेली ५० हजाराची रोख रक्कम लंपास केली असून गणपती मंदिराच्या खिडकीचे गज खालून निखळविल्यानंतर आत प्रवेश करून ह्या मंदिरात असलेली फंड पेटी लंपास केली. कुठ्ठाळी चर्चमध्ये झालेल्या चोरी प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज वेर्णा पोलीसांना मिळालेली असून चोरी करण्यासाठी आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांच्या हातात हत्यारे असल्याचे ह्या फुटेजवरून स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार ह्या दोन्ही चोऱ्या बुधवारी (दि.२४) मध्यरात्री १२ नंतर घडल्या. कुठ्ठाळी येथे असलेल्या सेंट फीलीप अॅण्ड जेंम्स चर्च कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे टाळे (मध्यरात्री २ च्या सुमारास) तोडून तीन अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे चर्चचे धर्मगुरू फादर पीयो आल्मेदा यांना सीसीटीव्ही वरून दिसून येताच त्यांनी याबाबत पोलीसांना माहिती दिली. ह्या तीन अज्ञात चोरट्यांपैकी दोघांनी आपले चेहरे मुखवटा घालून झाकले होते तर एकाने हॅल्मेट घातले असून तिघांच्या हातात हत्यारे (कोयता, चोपर इत्यादी) होती, अशी माहीती चर्चचे धर्मगुरू फादर आल्मेदा यांनी पत्रकारांना दिली. चर्च कार्यालयात चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळावर दाखल झाले, मात्र तोपर्यंत या कार्यालयातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन त्या चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा काढला होता. कुठ्ठाळी भागात चोरी घडल्याने ह्या भागात राहणाऱ्या नागरिकात भीती निर्माण झाली असतानाच आज सकाळी येथून थोड्याच अंतरावर असलेल्या साकवाळ येथील गणपती मंदिरात चोरट्यांनी घुसून येथे चोरी केल्याचे उघड झाल्याने नागरिकात सुरक्षेच्या दृष्टीने भिती व्यक्त करण्यात येत आहे. साकवाळ येथील गणपती मंदिराच्या खिडकीचे गज खालच्या भागातून निखळविल्यानंतर ह्या मंदीरात चोरट्यांनी प्रवेश केला असल्याचे वेर्णा पोलीसांना तपासणीच्या वेळी स्पष्ट झाले आहे. सदर मंदिरात असलेली दानपेटी चोरट्यांनी घेऊन मंदिरातून पोबारा काढला. वेर्णा पोलिसांकडून ह्या मंदिरातील चोरी प्रकरणाची तपासणी करण्यात येत असताना चोरट्यांनी लंपास केलेली दानपेटी मंदीरापासून सुमारे १०० मीटर दूर असलेल्या खुल्या जागेत फेकण्यात आल्याचे आढळून आले असून यात असलेली रक्कम त्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. या दानपेटीत सुमारे ५ हजार रुपयांची रोख रक्कम असण्याचा संशय मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कुठ्ठाळी मतदारसंघातील जवळपास असलेल्या दोेन धार्मिक स्थळात चोरी घडल्याचा प्रकार आज सकाळी सर्वत्र पसरताच नागरिकात याबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुठ्ठाळी व साकवाळ ह्या दोन्ही ठिकाणी घडलेल्या चोऱ्या एकाच टोळीने केल्या असाव्या असा संशय वेर्णा पोलिसांकडून सध्या व्यक्त करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी वेर्णा पोलीसांकडून कडक रित्या गस्ती होत नसल्याची प्रतिक्रीया काही नागरिकांनी व्यक्त करून भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी येथे पोलीसांच्या गस्तीत वाढ करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.
कुठ्ठाळी मतदारसंघातील चर्च, मंदिरात चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 10:39 PM