पणजी : सरकारला जर म्हादई, पर्यावरण सांभाळता येत नसेल तर सर्वांनी राजीनामे द्यावे व कर्नाटकला जावे, असा कडक इशारा सेव्ह म्हादई, सेव्ह टायगरचे राजन घाटे यांनी दिला आहे. म्हादई अभयारण्य क्षेत्र हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. मात्र सरकार केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी व्याघ्र संरक्षित क्षेत्र अधिसूचित करण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
घाटे म्हणाले, की म्हादई ही आपली आई असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र त्यांना त्यांची खुर्ची जास्त प्रिय आहे. त्यामुळेच म्हादई वाचवण्यासाठी म्हादई अभयारण्य क्षेत्र हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यास ते कुठलाही रस दाखवत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. गोव्याला पर्यावरण हानीची भीती असतानाही सरकार गंभीर नाही. वाघांचे अस्तित्व हे जंगलातच असते. सरकारातील मंत्री सनातन धर्मावर बोलतात. मात्र व्याघ्र संरक्षण क्षेत्रावर बोलत नाही. म्हादई अभयारण्य क्षेत्रात ५०च्या आसपास घरे आहेत. परंतु तेथील लोकप्रतिनिधी एक हजारांहून अधिक घरे असल्याचे चुकीचे सांगत असल्याची टीका त्यांनी केली.