पणजी : गोव्यात आम आदमी पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आणखी सात उमेदवारांची नावें जाहीर केली आहेत. निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याआधी उमेदवार जाहीर करणारा आप हा पहिला पक्ष ठरला आहे. याआधी चार नावे जाहीर करण्यात आली होती त्यामुळे घोषित झालेल्या एकूण उमेदवारांची संख्या ११ झाली आहे.
बाणावली मतदारसंघात रॉयला क्लारा फर्नांडिस यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्या पेशाने आर्किटेक्ट असून बाणावलीच्या विद्यमान पंच सदस्य तसेच माजी सरपंच होत. राजकारणात त्या सक्रीय आहेत. कु ठ्ठाळी मतदारसंघात आॅलेन्सियो सिमॉइश यांना तिकीट जाहीर झाले आहे. ते मच्छिमारांचे नेते असून पेशाने शिक्षक आहेत. अखिल गोवा मच्छिमार संघाचे ते सरचिटणीस आहेत. त्यांचे शिक्षण एमबीएपर्यंत झालेले आहे. राष्ट्रीय मच्छिमार महासंघाचे ते सदस्य आहेत. मडकई मतदारसंघात युवा नेते सुरेल दत्ता तिळवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. बांदोडा युथ क्लबचे ते पदाधिकारी आहेत. नूपूर डान्स अकादमीशी त्यांचा संबंध असून कोकणी भाषा मंडळाचे ते सचिव आहेत.
मांद्रे मतदारसंघात देवेंद्र प्रभूदेसाई यांना तिकीट जाहीर करण्यात आली आहे. ते पेशाने शिक्षक असून शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तसेच गोवा हॅण्डबॉल अकादमीचे अध्यक्ष आहेत. पर्यें मतदारसंघात सीताराम गांवस यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. ते व्यावसायिक असून त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. भाजपच्या युवा मोर्चा तसेच राज्य कार्यकारिणीवर पदाधिकारी म्हणून त्यानी काम केलेले आहे. अंमली पदार्थविरोधी कृती समितीवरही त्यांनी काम केले आहे. शिवोली मतदारसंघात पृथ्वीराज आमोणकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. अॅडव्हेंचर बायकिंगची त्यांना आवड आहे. मुरगांवमध्ये काँग्रेसचे माजी आमदार जिओवानी कार्ल वाझ यांना उमेदवारी दिलेली आहेत. ते व्यावसायिक असून २00२ ते 0७ या कालावधीत विधानसभेत होते.