पणजी : मुरगाव तालुक्यात कोळशाची समस्या आहेच. लोकांनी आम्हाला त्याविषयी सांगितले आहे. प्रदुषणाविरुद्ध कडक उपाययोजना प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार करील, असे भाजपचे दक्षिण गोवा प्रचार प्रमुख व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री सावंत यावेळी माविन यांच्या बाजूला बसले होते. मुरगावमध्ये कोळसा प्रदुषणाचा प्रश्न आहे काय असे पत्रकारांनी विचारताच गुदिन्हो म्हणाले, की निश्चितच आहे. लोकांना प्रदूषण बंद झालेले हवे आणि आमचे सरकार कडक उपाययोजना करण्यास संबंधित कंपन्यांना भाग पाडेल. मोठा डोम बांधून प्रदूषण रोखता येते. कितीही वारे आले तरी, मग प्रदूषण होत नाही.
माविन म्हणाले, की सरकार उपाययोजना करील असा वास्कोतील व मुरगाव तालुक्यातील लोकांना विश्वास आहे. लोकांनी भाजपवर विश्वास दाखवला आहे. एमपीटीमध्ये मालाची हाताळणी पूर्ण बंद करावी अशी लोकांची मागणी नाही. माल हाताळणी सुरूच रहायला हवी पण प्रदूषण तेवढे बंद व्हायला हवे. काहीवेळा रस्त्याच्या बाजूला जी भुकूटी पडलेली असते ती देखील वारा आल्याबरोबर हवेत उडते व प्रदूषण होते.
खडपकर भाजपमध्ये दरम्यान, माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी त्यांच्या अनेक पाठीराख्यांसह शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन खडपकर यांचे पक्षात स्वागत केले. खडपकर हे 1993 सालापासून भाजपमध्ये होते. मध्यंतरी ते भाजपपासून वेगळे झाले होते. त्यांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने आहेत. शिमगोत्सव समितीचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष आहेत. आता दुस:यांदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. आपण भाजपसाठी लोकसभा निवडणुकीत झोकून देऊन काम करीन, असे खडपकर यांनी सांगितले. गुदिन्हो यांनी आपल्याला कायम पाठींबा व प्रोत्साहन दिले असे खडपकर म्हणाले.