पणजी : राज्यातील दक्षिण उत्तर सीमेवरील पेडणे तालुक्यातील हरमल गावात एक डॉग टेम्पल आहे. ह्या डॉग टेम्पलमध्ये अनेक भटक्या कुत्र्यांना आश्रय दिला जातो. त्यांचे खाणे-पीणे तसेच वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. एक विदेशी महिला हे डॉग टेम्पल चालवित आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी विधानसभेत ही माहिती दिली. मुद्दा होता भटक्या कुत्र्यांचा. मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर यांनी शून्य तासाला हा मुद्दा लक्ष्यवेधी सूचनेच्या स्वरूपात उपस्थित केला होता. ह्या भटक्या कुत्र्यांमुळे लोकांना आणि विशेषत: पर्यटकाना त्रास होतो अशी त्यांची तक्रार होती. यावर बोलताना आमदार जीत आरोलकर यांनी ह्या डॉग टेम्पलची माहिती दिली.
ते म्हणाले की हरमलमधील या डॉग टेम्पलमध्ये सध्या ७० कुत्रे आहेत. भटके कुत्रे अन्नाविना मरू नयेत, त्यांची हेळसांड होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. कुठेही असे भटकी कुत्री सापडल्यास त्याना या ठिकाणी आणले जाते. त्यांच्या जेवणाखाण्याची तसेच गरज पडल्यास वैद्यकीय उपचारांचीही सोय केली जाते. हे डॉग टेम्पल एक विदेशी माहिला चालवित आहे. त्यासाठी लाखो रुपये ती खर्च करीत आहे. एक विदेशी महिला जर संवेदनशील बनून गोव्यात हे काम करू शकते तर सरकार का करू शकत नाही? असा प्रश्नही आमदार आरोलकर यांनी केला. हरमलच्या ह्या डॉग टेम्पलवर आणि भटक्या कुत्र्यांवर सभागृहात बरीच चर्चा झाली. त्यानंतर भटक्या कुत्र्यांसाठी सरकारकडून धोरण आखले जाणार असल्याचेही मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.