लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा म्हादईच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी सरकारकडून केल्या जात आहेत. त्यासाठी कुठल्याच प्रकारची तडजोड सरकारकडून केली जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त म्हापसा येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, लवादासमोरील मुद्दा असो वा सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्याचा मुद्दा असो, सरकार याबाबत कुठेच कमी पडणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. गोवा पोलिस ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी, कल्याणासाठी वचनबद्ध आहेत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिर, मनोरंजन कार्यक्रम तसेच सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळताना ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. यावेळी पोलिस महासंचालक जसपाल सिंग, पोलिस महानिरीक्षक, उत्तर गोवा अधीक्षक निधीन वाल्सन, उपअधीक्षक जीवबा दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
गोवा पोलिस सतत ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्यासाठी तत्पर राहणार आहेत. घरात एकटे राहत असल्यास पोलिसांचे सहकार्य घ्या, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांना केले. मनुष्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणे हे सर्वात मोठे काम असते आणि ते या कार्यक्रमातून दाखवून देण्यात आले. आजच्या युवकांनी ज्येष्ठ नागरिकांकडून शिकून घेणे गरजेचे असून, निरोगी तसेच फिट राहण्यासाठी योगा करण्याची मैदानी खेळ खेळण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
निधीन वाल्सन यांनी बोलताना पालक आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली. चांगल्या जीवनशैलीसाठी स्थलांतर वाढले आहे, असे असले तरी पालकांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.