लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'अटल सेतू हा देशातील सर्वोत्तम प्रकल्पांपैकी एक आहे. त्याची वेळोवेळी देखभाल करण्यात येते. महत्वाचे म्हणजे देशातील अव्वल कंपनी या पुलाची देखरेख करत असते. त्यामुळे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे किंवा येथे घोटाळा झाला आहे, असे म्हणणे चुकीचे आहे,' असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पात भ्रष्टाचार झालेला नाही, असे ते म्हणाले.
कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आपल्याला कला अकादमीच्या विषयावरुन टार्गेट करण्यात येत आहे. पण, अटल सेतूबाबात काही गोष्टी घडल्या, त्याबाबत कुणीच बोलत नाही असे विधान काल केले होते. त्यावर मंत्री सुदीन ढवळीकर यांनी प्रत्युतर दिले आहे.
'आमच्या सरकारमधील मंत्र्याने काय म्हटले किंवा काय आरोप केला, याबाबत मी काहीच बोलणार नाही. मी येथे फक्त अटल सेतूच्या कामाबद्दल बोलत आहे. अटल सेतू हा राज्यातील चांगला प्रकल्प आहे. तो देशातीलही एक सर्वोत्तम प्रकल्प आहे,' असे ढवळीकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले.
दरम्यान, मंत्री सुदीन ढवळीकर आणि गोविंद गावडे हे परस्परांचे कट्टर प्रतीस्पर्धी मानले जातात. यापूर्वी विधानसभेत विविध विषयांवरून गावडे यांनी ढवळीकर यांच्याविरुद्ध टीकेची झोड उठवली होती. आता कला अकादमीतील भ्रष्टाचार प्रकरणी विरोधकांनी गावडे यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर गावडे यांनी उटक सेतूचा उल्लेख केला होता. त्यानंतर ढवळीकर यांचे अटल सेतूविषयीचे स्पष्टीकरण महत्वाचे मानले जात आहे.
अटल सेतूत भ्रष्टाचाराचे मी बोललोच नव्हतो
'अटल सेतूबद्दल का बोलत नाहीत, आपल्याच बाबतीत का बोलतात? असे आपण म्हटलेच नव्हते असा खुलासा कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केला आहे. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की मी कोंकणीतून बोललो होतो. माझे विधान सार्वजनिक होते, परंतु त्याचा विपर्यास करून ते प्रसिद्ध करण्यात आले' असेही मंत्री म्हणाले. दरम्यान त्यांच्या या कथित वक्तव्यामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे तर भाजपमधील नेतेही त्यांच्यावर नाराज आहेत.
आपल्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण देताना गावडे म्हणाले की, मी अटल सेतूविषयी विधान केलेले नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला. कला अकादमीविषयी प्रश्नाला उत्तर देताना मी जुना स्लॅब कोसळल्याचे सांगितले. तेव्हा मी म्हणालो की, अटल सेतूविषयी बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. मेंटेनन्सचे काम करून तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे, मग त्याला घोटाळा म्हणता येईल का, असा माझ्या विधानाचा अर्थ होता. मात्र तो हेतुपुरस्सर बदलला गेला. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे ही बाब मी सभापतींच्यासुद्धा निदर्शनास आणून देणार आहे.'