- पूजा नाईक प्रभूगावकर
पणजी - आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांना अपशब्द वापरल्याचा आपला ऑडिओ व्हायरल झाला आहे. मात्र यात काेणतेही तथ्य नाही. आपल्यावरील आरोप खाेटे असल्याचा दावा कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी केला आहे.
विधानसभा संकुलात जाताना गावडे यांनी याविषयावर इतकीच प्रतिक्रिया देत , त्यावर अधिक बोलणे टाळले. परंतु ते यावेळी बरेच गंभीर दिसून आले. संचालक रेडकर व मंत्री गावडे यांच्यातील फोनवरील संभाषणाचा ऑडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात गावडे हे रेडकर यांना अपशब्द वापरत असून मुख्यमंत्री व सभापती तथा काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांच्यावरही भाष्य करीत आहेत.
सदर ऑडिओ हा मंगळवारी व्हायरल झाल्याने गावडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यापूर्वी कला व संस्कृती खात्याच्या निधी वाटपात घोटाळा झाला असून यात संबंधीत खात्याचे मंत्री गावडे यांचाही समावेश असल्याचा आरोप सभापती तवडकर यांनी केला होता. निधी वाटप घोटाळ्या प्रकरणी गावडे यांची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली होती.