पणजी : काँग्रेसने मला नोटीसही न बजावता पक्षातून बडतर्फ केले आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले. पणजी महापालिकेत सांतिनेज नाल्यासंबंधी सादरीकरणाच्यावेळी ते आले होते. मी काँग्रेसमध्ये कधीच जाणार नाही; कारण माझ्यावर कारवाई करण्यापूर्वी साधी नोटीस बजावून स्पष्टीकरण मागण्याची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करावी, असे या पक्षाला वाटले नाही. त्यामुळे या पक्षात मी पुन्हा का जाऊ, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. येत्या निवडणुकीत युनायटेड गोवन्स डेमोक्रेटीक पार्टी (युगोडेपा) बनविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून पुढील महिन्यापर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. युगोडेपा स्थापन केल्यास कोणत्या पक्षाशी हातमिळवणी करण्याचा विचार आहे काय, असे विचारले असता त्यांनी तो निर्णय नंतर घेतला जाईल, असे सांगितले. भाजपशी समझोत्याच्या शक्यतेविषयी विचारले असता ते म्हणाले की, भाजप आणि काँग्रेसने मला राजकारणातून बाहेर फेकण्यासाठी हातमिळवणी केली होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्यात काहीच अर्थ नाही. पार्टी इतर पक्षांशी समझोता करणार आहे; परंतु कोणत्या पक्षाशी करणार आहे, हे एवढ्यात सांगणे योग्य नाही. अपक्ष आमदार विजय सरदेसाई आपले चांगले मित्र असल्याचे ते म्हणाले. योग्यवेळी याविषयी माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले. बाबूश यांच्या काँग्रेसमध्ये परतण्याच्या मुद्द्यावर बोलताना महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी सांगितले की, हा प्रश्न अगोदर आमदार पांडुरंग मडकईकर यांना विचारा. बाबूश काँग्रेसमध्ये परतले, तर आपण काँग्रेस सोडू, अशी घोषणा मडकईकर यांनी काँग्रेस हाउसमध्ये केली होती, असे ते म्हणाले.
काँग्रेसमध्ये कदापि प्रवेश नाही : बाबूश
By admin | Published: April 23, 2016 2:27 AM