मडगाव: वाहतूक नियम मोडणा-यांविरोधात सेन्टिनल्सच्या माध्यमातून दंड देण्याच्या सुरू केलेल्या कारवाईला गोव्यातील विविध स्तरांतून विरोध होत असतानाच सेन्टिनल्सद्वारे मुलींचे फोटो काढून त्यांचा गैरवापर केला जातो असाही आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी मानवाधिकार आयोगाला लिहिलेल्या पत्रात वाहतूक सेन्टिनल्सद्वारे मुलींचे फोटो घेऊन त्या फोटोंचा गैरवापर केला जातो, असा आरोप जरी केला जात असला तरी अशाप्रकारची एकही तक्रार आतापर्यंत पोलिसांकडे दाखल झालेली नाही, असा खुलासा गोवा पोलिसांतर्फे करण्यात आला आहे.युवतींच्या मान्यतेशिवाय सेन्टिनल्सद्वारे फोटो घेऊन त्यांच्या मानवाधिकारांचा भंग केला जातो असा दावा करून मानवाधिकार आयोगाकडे केलेल्या तक्रारीसंदर्भात आयोगाने मुख्य सचिव, वाहतूक सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याकडून अहवाल मागितल्याच्या पार्श्वभूमीवर महासंचालक मुक्तेश चंदर यांनी आयोगाला पाठविलेल्या उत्तरात वरील गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. या व्यवस्थेच्या विरोधात काही आमदारांनी आक्षेप घेतले असले तरी ते आक्षेप वस्तुस्थितीवर आधारित नसून केवळ ऐकीव माहितीवर असल्याचे पोलिसांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.सेन्टिनल्सद्वारे घेतले जाणारे फोटो वेश्या व्यवसायातील दलालांना पुरविले जातात असा आरोप काही आमदारांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ही नोटीस पाठविली होती. या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट करताना ट्रॅफीक सेन्टिनल अॅपद्वारे जे फोटो घेतले जातात ते थेट पोलीस यंत्रणोकडे पोहोचतात. हे फोटो कुठल्याही फोनच्या गॅलरीवर स्टोअर होत नाहीत याकडेही लक्ष वेधले आहे. या अॅपद्वारे घेतलेले फोटो थेट सर्व्हरवर अपलोड होत असल्याने त्याचा गैरवापर होणे शक्य नाही, असेही या उत्तरात म्हटले आहे.सेन्टिनल्सद्वारे घेतले जाणा-या मुलींच्या फोटोंचा गैरवापर केला जात आहे असा जरी आरोप केला जात असला तरी घेतले जाणारे फोटो बहुतेक मागच्याबाजूने घेतले जातात त्यामुळे या फोटोंचा गैरवापर होणो शक्य नाही. एवढेच नव्हे तर सामाजिक सहकार्याशिवाय कुठल्याही यंत्रणोला आपले काम प्रभावीरित्या करता येत नाही. वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठीही अशा सामाजिक सहकार्याची नितांत गरज आहे याकडेही चंदर यांनी आपल्या उत्तरातून लक्ष वेधले आहे.
सेन्टिनल्सच्या फोटोंचा गैरवापर झाल्याची एकही तक्रार नाही- पोलीस महासंचालक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 7:33 PM