पणजी : पर्यटन खात्याचे व्यवहार आणि एकूण कारभार मी पारदर्शक बनवीन. भ्रष्टाचाराला मुळीच थारा देणार नाही व किनारपट्टी स्वच्छता कंत्राटासारख्या वादांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेईन, असे नवे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी मंगळवारी येथे ‘लोकमत’ला सांगितले.आजगावकर म्हणाले की, शॅक मालक, टॅक्सी व्यावसायिक, टूर अॅण्ड ट्रॅव्हल एजन्सी आणि पर्यटन व्यवसाय क्षेत्रातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची माझी इच्छा आहे. यापूर्वीच्या काळात पर्यटन क्षेत्रात झालेले वाद मला टाळायचेत. गोव्याची पारंपरिक कला व संस्कृती जपूनच आम्हाला पर्यटनाचा विकास करायचा आहे.आजगावकर म्हणाले की, ग्रामीण भागात पर्यटन नेण्यावर आणि इको-टुरिझमवर माझा भर असेल. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना गोव्याच्या निसर्गाचे आणि पारंपरिक व ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व्हावे, या उद्देशाने पावले उचलली जातील. गोव्याच्या लोककला व लोकसंस्कृतीचे दर्शन पर्यटकांना घडायला हवे. मोपा येथे उभा राहणारा नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ गोव्याच्या पर्यटन विकासासाठी साहाय्यभूत ठरेल.दरम्यान, कळंगुटचे भाजप आमदार मायकल लोबो म्हणाले की, आजगावकर यांच्याकडून पर्यटनमंत्री म्हणून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. माझा पर्यटन खात्याबाबतचा अनुभव वाईट आहे. कळंगुट-कांदोळीसह गोव्याच्या संपूर्ण किनारपट्टीतील लोकांनी नव्या पर्यटनमंत्र्यांकडून व त्यांच्या नेतृत्वाखालील पर्यटन खात्याकडून खूप अपेक्षा ठेवलेल्या आहेत. येत्या तीन-चार महिन्यांत मंत्री आजगावकर यांच्या कामाची झलक पाहायला मिळेल, अशी मी आशा करतो. खाण व्यवसायात मंदीचे वातावरण असल्याने पर्यटन हाच गोव्याचा प्रमुख व्यवसाय बनला असून पर्यटन खाते हे या व्यवसायाच्या केंद्रस्थानी आहे, हे नव्या मंत्र्यांनी लक्षात घ्यावे.(खास प्रतिनिधी)
पर्यटन खात्यात आता भ्रष्टाचारास थारा नाही!
By admin | Published: March 22, 2017 1:44 AM