पणजी : बांधकाम खात्याकडील निधीचा असलेला अभाव पुन्हा एकदा स्पष्ट झाला. करंझाळे, ताळगाव भागात मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त करणे आर्थिक चणचणीमुळे शक्य नसल्याचे खुद्द प्रधान मुख्य अभियंत्यानेच रस्ता दुरुस्तीची मागणी घेऊन गेलेल्या भाजप शिष्टमंडळाला सांगितले आणि सर्वजण थक्कच झाले. कंत्राटदारांची बिले फेडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे बिले पडून असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने दिले होते. सुमारे १५0 कोटी रुपयांची बिले निधीअभावी परत गेली आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपचे ताळगाव मंडल अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने करंझाळे, ताळगाव येथील रस्त्यांची झालेली दुर्दशा निदर्शनास आणण्यासाठी आल्तिनो येथे बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता दत्तात्रय बोरकर यांची भेट घेतली. करंझाळे ते आयवांव रस्ता हॉटमिक्सिंगचे काम अडले आहे. व्हडलेभाट भागात रस्त्यांची वाताहात झालेली आहे. शंकरवाडी, ताळगाव भागात हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम आश्वासन देऊनही होऊ शकलेले नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक किशोर शास्री, प्रभाग १६ चे नगरसेवक प्रमेय माईणकर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या भेटीनंतर शास्री ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, बोरकर यांचे हे उत्तर अनपेक्षित होते. निधी नाही, हे कारण होऊ शकत नाही. मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त करून होते तसे पूर्ववत करून देणे खात्याची जबाबदारी आहे, ती झटकून चालणार नाही. करंझाळे येथे सिंडिकेट बँकेजवळ अनानाझ हॉटेल ते मर्टिन्स मरोड या रस्त्याची पूर्णपणे वाताहात झालेली आहे. तो तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे. खोदकाम केलेल्या ठिकाणी रस्तेच नव्हते, अशी बचावाची भूमिका आता खाते घेत असल्याचा आरोप करून त्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. शिष्टमंडळात ताळगाव महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा पालेकर, पदाधिकारी शिवप्रसाद केंकरे, पंच रघुवीर कुंकळकर, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
रस्ते दुरुस्तीसाठीही निधी नाही
By admin | Published: April 20, 2016 1:48 AM