ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 6 - तब्बल ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या मालकीचा कांदोळीतील किंगफिशर व्हिला प्राथमिक बोली आणखी दहा टक्क्यांनी कमी करून तिसऱ्यांदा लिलांवात काढला असतानाही खरेदीसाठी कोणी फिरकले नाहीत. मुंबईतील विले-पार्ले येथील किंगफिशर हाऊसलाही चौथ्यांदा कोणीच बोलिदार मिळू शकला नाही. मुंबईतील विले-पार्ले येथील किंगफिशर एअरलाइन्सच्या मुख्यालयाच्या मालमत्तेसाठी १0३.५ कोटी रुपये तर गोव्यातील कांदोळीच्या किंगफिशर व्हिलासाठी ७३ कोटी रुपये प्राथमिक बोली लावण्यात आली. या दोन्ही मालमत्तांच्या बाबतीत विचारणा झाली आणि माहितीही घेण्यात आली, परंतु बोली लावण्यासाठी कोणीच पुढे आला नाही. मल्ल्या यांना कर्ज दिलेल्या बँकांच्यावतीने स्टेट बँकेच्या एसबीआयकॅप ट्रस्टीने कर्जवसुलीसाठी या मालमत्ता विक्रीस काढल्या आहेत. कांदोळीतील किंगफिशर व्हिला डिसेंबरमध्ये झालेल्या लिलांवात ८१ कोटी रुपये प्राथमिक बोली लावली होती ती दहा टक्क्यांनी कमी करण्यात आली. या व्हिलामध्ये मल्ल्या यानी अनेकदा बड्या पार्ट्या झोडलेल्या आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये पहिल्या लिलांवाच्यावेळी प्राथमिक बोली ८५.२९ कोटी रुपये होती. विले-पार्लेतील किंगफिशर हाऊसच्या बाबतीत डिसेंबरमध्ये झालेल्या याआधीच्या लिलावात ११५ कोटी लावली होती. गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रथम ही मालमत्ता विक्रीस काढण्यात आली तेव्हा १५0 कोटी रुपये प्राथमिक बोली होती. दुसऱ्यावेळी लिलावात ती कमी करून १३५ कोटी रुपये करण्यात आली. हे किंगफिशर हाऊस १७ हजार चौरस फूट जागेत आहे. भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय, बँक आॅफ बडोदा, फेडरल बँक, एक्सिस बँक आदी बँकांचे मिळून सुमारे ९ हजार कोटी रुपये कर्ज मल्ल्या देणे असून गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून त्यांनी इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेला आहे. (प्रतिनिधी)
माल्यांच्या ‘किंगफिशर व्हिला’साठी तिसऱ्यांदाही बोली नाही
By admin | Published: March 06, 2017 8:38 PM