पणजी: राफेल डील प्रकरणात व्हायरल झालेला आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या आवाजातील व्हिडिओ हा आपला नसल्याचा आणि तो फेरफार करून (डॉक्टर्ड) बनविण्यात आलेला बोगस व्हिडिओ असल्याचे राणे व भाजपाने म्हटले असले तरी अद्याप पोलीस स्थानकात या प्रकरणात तक्रारही नोंदविण्यात आलेली नाही आणि पोलीस मुख्यालयालाही कोणतीच सूचना करण्यात आलेली नाही.
व्हिडिओ डॉक्टर्ड असून या प्रकरणात तपास करून दोषी माणसावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राणे यांनी केली होती. तसे आपण मुख्यमंत्री पर्रीकर आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही सांगितले असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. मुख्यमंत्र्यांना यासंबंधी पत्र लिहून तशी मागणी केल्याचेही त्यांनी म्हटले होते. मुख्यमंत्री पोलिसांना योग्य त्या सूचना करून या प्रकरणाचा तपास करतील असे म्हटले होते.
या प्रकरणानंतर ३६ तास उलटल्यानंतरही या ऑडिओसंबंधी सायबर विभागाकडे किंवा राज्यातील कोणत्याही पोलीस स्थानकात किंवा क्राईम ब्रँचमधेही तक्रार नोंदविण्यात आली नव्हती. एवढेच नव्हे तर पोलीस मुख्यालयालाही यासंबंधी कोणतीच सूचना किंवा माहिती देण्यात आलेली नसल्याची माहिती पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यानी दिली.
ऑडिओ बोगस असल्याचे आरोग्यमंत्री सांगतात आणि भाजपनेतेही सांगतात. कॉंग्रेसचेच हे कारस्थान असल्याचे स्वत: मुख्यमंत्रीही सांगतात. ऑडिओ बोगस असल्याची इतकी खात्री जर भाजपला व सरकारला आहे तर पोलीस चौकशी अद्याप का केलेली नाही या प्रश्नाचे उत्तर कुणाही भाजप नेत्याकडे नाही. बुधवारी आरोग्यमंत्र्यांनीही ते देणे टाळले होते.