पणजी : गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या कदंब महामंडळाला केंद्राच्या 'फेम' योजनेखाली ५० इलेक्ट्रिकल बसगाड्या मंजूर झाल्या असून येत्या नोव्हेंबरमध्ये या गाड्या रस्त्यावर धावतील, अशी माहिती महामंडळाचे चेअरमन आमदार कार्लोस आल्मेदा यांनी दिली. सार्वजनिक खाजगी सहभाग तत्त्वावर या बसगाड्या सेवेत घेतल्या जाणार असून मालकी कदंबाचीच राहील, असे सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेत बोलताना आल्मेदा तसेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वेनान्सियो फुर्तादो त्यांनी अशी माहिती दिली की, या प्रत्येक बस गाडीसाठी दोन ते दोन कोटी 30 लाख रुपये खर्च येणार आहे. केंद्राकडे महामंडळाने २५० गाड्यांची मागणी केली होती. त्यातील ५० मंजूर झाल्या आहेत. लवकरच टेंडर काढून पहिल्या टप्प्यातील गाड्या नोव्हेंबरपर्यंत रस्त्यावर येतील, त्यासाठी काही मार्गही निश्चित केले आहेत.
पणजी ते काणकोण, पणजी ते मडगाव, पणजी ते वास्को, पणजी ते कारवार, पणजी ते वाळपय, पणजी ते नेत्रावळी या मार्गावर गाड्या चालवल्या जातील. इलेक्ट्रिक गाड्यांमुळे खर्चही कमी होईल. इंधनावर व इतर गोष्टीवर कदंबला प्रतिकिलोमीटर 52 रुपये खर्च येतो. तर उत्पन्न प्रति किलोमीटर 37 रुपये आहे.
सरकारच्या आर्थिक सलाईनवरच महामंडळाचा कारभार चालतो. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक किती दिलासा मिळेल, असा प्रश्न केला असता सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक बससाठी प्रति किलोमीटर अकरा रुपये खर्च येईल. सरकारची इलेक्ट्रिक वाहन धोरण तयार होताच यात आणखी सवलत मिळेल. त्यामुळे प्रवाशांनाही दिलासा मिळेल पुढील पाच-सहा वर्षात ७५ टक्के इलेक्ट्रिक बसेस महामंडळाच्या ताफ्यात येतील.
राज्यातील वेगळ्या १०८ ग्रामीण मार्गावर बस गाड्या सुरू करण्याची मागणीही कालांतराने पूर्ण केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र सरकारने महिला चालक सेवेत घेतले आहेत, अशी काही व्यवस्था करणार आहात का, या प्रश्नावर घाटे म्हणाले की, भरती नियमानुसार महिला चालकाला किमान तीन वर्षांचा अवजड वाहने चालवण्याचा आवश्यक आहे, तसे मनुष्यबळ येथे उपलब्ध नाही. सध्या १८ महिला वाहक महामंडळाच्या सेवेत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला महामंडळाचे संचालक महानंद अस्नोडकर उपस्थित होते. त्यांनी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.