पणजी : नववर्ष गोव्यात साजरे करण्यासाठी देशी पर्यटकांनी राज्यात तुफान गर्दी केली आहे. उत्तर व दक्षिण गोव्यातील किनारी भागांतील बहुतेक हॉटेलांमधील खोल्या पर्यटकांनी भरल्या आहेत. दि. ३१ डिसेंबरच्या रात्री गोव्यात उपस्थित राहून नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी देशभरातील पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळले आहेत.
कोविडची धास्ती असली तरी, देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत गोवा राज्य पर्यटनासाठी सुरक्षित आहे, असे पर्यटक मानतात. कारण येथे कोविडग्रस्तांची संख्या खूप कमी झालेली आहे. पूर्वी दिवसाला पाचशे ते सातशे कोविडग्रस्त आढळायचे. आता रोज नवे शंभर कोविडग्रस्त आढळतात. अनेक हॉटेलांनी नववर्षानिमित्त खास मेजवान्यांचे आयोजन केले आहे. आज ३१ रोजी रात्री मेजवान्या होतील. त्यात लाखो पर्यटक सहभागी होतील. यावेळी देशी पर्यटकच जास्त आहेत. काही होटेलांनी छोटे कार्यक्रम आयोजित केले आहेत. देशातील काही बडे राजकारणी, काही मंत्री, माजी मंत्री, काही निवृत्त न्यायाधीश, काही उद्योगपती यांनी नववर्ष साजरे करण्यासाठी गोवा राज्य गाठले आहे.
दरम्यान, कळंगुटचे आमदार असलेले मंत्री मायकल लोबो यांच्या मालकीच्याही काही होटेल्स आहेत. यावेळी सर्व हॉटेलांमध्ये खोल्या पर्यटकांनी भरल्या आहेत, असे लोबो यांनी सांगितले.